नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पाथर्डी शिवारातील (Pathardi Shivar) ‘गजरा नंदनवन’ इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून बारावीत शिकणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने (Girl Student) जीवनयात्रा संपवली. आदिती सचिन दाहेदार असे या विद्यार्थिनीचे नाव असून, तिच्या या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी(दि. १) नेहमीप्रमाणे क्लासवरून परतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आदितीने बेडरूममधून खाली उडी घेतली. तिच्या बेडरूममध्ये पोलिसांना ‘सुसाईड नोट’ सापडली असून, प्राथमिक तपासात अभ्यासाचा (Study) तणाव हे कारण असल्याचे पाेलिसांनी सांगितले आहे. क्लास संपल्यानंतर वडील सचिन दाहेदार तिला घरी घेऊन आले. हॉलमध्ये आई-वडील बोलत असताना आदिती बेडरूममध्ये गेली आणि तिने थेट सातव्या मजल्यावरून खाली झोकून दिले. इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) घटनास्थळी धाव घेत मोबाईल व सुसाईड नोट जप्त केली आहे.
उपनिरीक्षक युवराज शिरसाठ आणि हवालदार नंदू हारपडे तपास करत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा शैक्षणिक व्यवस्थेवर आणि कौटुंबिक संवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १२ वीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी तो ‘आयुष्याचा शेवट’ असू शकत नाही. अभ्यासाच्या भीतीने किंवा अपयशाच्या भीतीने किशोरवयीन मुले असा मार्ग का निवडतात, यावर समाज आणि पालकांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आदितीच्या पश्चात आई-वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे.




