नाशिक | प्रतिनिधी
द्वारका येथील अय्यप्पा मंदिरासमोरील उड्डाणपुलावर रविवारी (दि. १२) रात्री लोखंडी सळईंनी (गज) भरलेला ट्रक आणि टेम्पोच्या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता आठ झाली आहे. अरमान खान (रा. राणेनगर, सिडको) असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात शर्थीचे उपचार सुरु होते. मात्र, तोंडाला व पोटाला गंभीर दुखापत होऊन अधिक रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान (दि. १६) त्याचा मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत.
धुळ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील अय्यप्पा मंदिरासमोरील द्वारका चौक उड्डाणपुलावरील पथदीप क्रमांक ७९ येथे रविवारी सायंकाळी अपघात झाला होता. सळईंनी भरलेला आयशर ट्रक (एमएच २५ यू ०५०८) व टेम्पो (एमएच १५ एफव्ही ५६०१) ही दोन्ही वाहने धुळ्याकडून मुंबईच्या दिशेने जात होती. उड्डाणपुलावर आयशर ट्रकवर मागून येणारा दोस्त टेम्पो जोरदार आदळला.
यानंतर ट्रकमधील सळई टेम्पोतून समोर बसलेल्या अतुल मंडलिक, चेतन पवार, दर्शन घरत, यश खरात, संतोष मंडलिक, विद्यानंद कांबळे, अनुज घरटे यांच्या शरीरात व डोक्यात शिरल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, उपचारादरम्यान गुरुवारी अरमान खान याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताप्रकरणी ट्रकचालक समीर निसार शहा याला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली असून ट्रकमध्ये सळई भरणाऱ्यासह ट्रक मालकावर प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते तपास करीत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा