नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महिला डॉक्टर मनीषा निलेश जेजूरकर यांच्या आत्महत्या प्रकरणात (Manisha Jejurkar Case) जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागप्रमुख संशयित डॉ. स्वाती नकुल वंजारी ऊर्फ डॉ. स्वाती शंकर चव्हाण यांना नाशिकच्या (Nashik) अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. पाटील यांनी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. साक्षीदारांवर किंवा पुराव्यांवर कोणताही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभाव न टाकण्याची ताकीद देण्यात आली आहे.
एफआयआर (FIR) दाखल झाल्यानंतर तब्बल सहा महिने नाव समाविष्ट नसणे, पोलिसांनी वारंवार बोलावूनही चौकशीस केलेले सहकार्य आणि घटनेच्या वेळी अथवा प्रत्यक्ष आत्महत्येस थेट चिथावणी दिल्याचा प्रथमदर्शनी पुरावा नसल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा दिलासा दिला आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात ७ मार्च २०२६ रोजी दाखल गुन्ह्यानुसार मनीषा जेजूरकर यांनी मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. मानसी यांचे पती डॉ. निलेश जेजूरकर (Nilesh Jejurkar) हे जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात कार्यरत आहेत.
मानसी यांच्या नातेवाइकांनी पोलिसांत (Police) दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. निलेश हे त्यांच्या विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांच्यासोबत जास्त वेळ घालवत असत व त्या मनीषा यांच्या घरीही ये-जा करत. तसेच जानेवारी २०२६ मध्ये डॉ. स्वाती यांनी मनीषा यांना फोन करून पती तुला पसंत करत नाही, तू कमी शिकलेली, कमी बुद्धिमत्तेची व रंगाने काळी आहेस, असे शब्द वापरल्याचा आरोप होता. पतीच्या या वागणुकीमुळे आणि कौटुंबिक बाबी डॉ. स्वाती यांना सांगण्यामुळे मनीषा तणावाखाली होत्या व त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा फिर्यादी पक्षाने केला होता.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांहून अधिक काळ स्वाती यांचे नाव संशयित आराेपी म्हणून समाविष्ट नव्हते. पोलिसांच्या बोलावण्यानुसार त्यांनी ९ वेळा पोलीस ठाण्यात आणि ३ वेळा गुन्हे शाखेत हजर राहून तपासाला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांचा मोबाइल १९ मे २०२६ पासून पोलिसांच्या ताब्यात असून कोणतीही नवीन रिकव्हरी राहिलेली नाही. स्वाती व मनीषा यांच्यात शेवटचा फोन संवाद जानेवारी २०२६ मध्ये झाला होता. आत्महत्येच्या दोन महिने आधी झालेला फोन आणि ५ मार्च २०२६ रोजी कौटुंबिक लग्नसमारंभातील ग्रुप फोटोवरून पती-पत्नीमध्ये झालेला वाद यांचा संबंध लावून आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा सिद्ध होत नाही.
सरकारी पक्षाचा विरोध
सरकारी वकील व तपास अधिकाऱ्यांनी जामिनाला विरोध केला. अनैतिक संबंध आणि फोनवरील अपमानास्पद शब्द आत्महत्येस कारणीभूत ठरले आहेत. स्वाती स्वतः मानसोपचारतज्ज्ञ असल्याने जामिनावर सुटल्यास त्या साक्षीदारांवर व तपासावर प्रभाव पाडू शकतात.
न्यायालयाचे निरीक्षण
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर एफआयआरच्या अवलोकनावरून ५ मार्च २०२६ रोजी मनीषा व तिच्या पतीत लग्नसमारंभातील फोटोवरून वाद झाला होता. त्यानंतर ७ मार्च रोजी त्यांनी आत्महत्या केली. जानेवारीतील फोन कॉलनंतरही पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरूच होते. स्वाती नाशिकच्याच रहिवासी असून त्या ११ वर्षांपासून शासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्या पळून जाण्याची शक्यता नाही आणि त्यांनी तपासाला सहकार्य केले आहे. साक्षीदारांवर दबाव आणण्याच्या सरकारी पक्षाच्या भीतीचे निरसन विशिष्ट अटी लादून केले जाऊ शकते, असे न्यायालयाने सांगितले.




