घोटी | वार्ताहर | Ghoti
वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Wadhivhare Police Station Area) गोंदे एमआयडीसी परिसरात घडलेल्या खळबळजनक गोळीबार प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणी एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून गावठी कट्टा, घातक शस्त्रे आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. मयूर मोहन जाधव, करण सोपान आवारे, ओंकार शरद भोसले आणि रोशन धोंगडे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे असून, त्यांच्यासोबत एका अल्पवयीन बालकाचाही समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १ गावठी कट्टा, २ चॉपर आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल हस्तगत केली आहे.
मालेगाव-नाशिक हायवेवर रचला सापळा
वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक २८३/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५१(२) व आर्म्स ॲक्टनुसार) या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. तपासादरम्यान संशयित आरोपी एका मारुती सुझुकी एर्टिगा वाहनाने मालेगावकडून नाशिकच्या दिशेने येत असल्याची गुप्त माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. माहिती मिळताच पथकाने तातडीने महामार्गावर सापळा रचला. संशयित वाहन येताच पोलिसांनी अत्यंत शिताफीने घेराव घालून ५ जणांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत संशयितांनी गोंदे एमआयडीसीतील गोळीबाराच्या घटनेत आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडक कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या आदेशानुसार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या कारवाईत पीएसआय सुदर्शन बोडके, पोलीस हवालदार प्रवीण काकड, संदीप नागपुरे, हेमंत गिलबिले, सचिन धारनकर, मयूर कांगणे, दीपक गुंजाळ, सतीश घुगे, संतोष गांगुर्डे, शिवाजी ठोंबरे, प्रवीण गांगुर्डे आणि माधव साळे यांच्या पथकाने कामगिरी बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास वाडीवऱ्हे पोलीस आणि एलसीबी करत आहे.




