Monday, August 24, 2026
Homeक्राईमNashik Crime News : बनावट डेअरी अन् सोन्याच्या अंगठ्यांचे गिफ्ट; पीएल टोळीचा...

Nashik Crime News : बनावट डेअरी अन् सोन्याच्या अंगठ्यांचे गिफ्ट; पीएल टोळीचा तत्कालिन कारभार उघड

लोंढे पिता-पुत्राचा माेक्कातील जामीन फेटाळला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर परिसरातील (Satpur Area) ऑरा बार गोळीबार प्रकरणातील (Firing Case) संशयित आणि पीएल ग्रुपचा प्रमुख प्रकाश उर्फ बॉस लोंढे व त्याचा मुलगा दीपक उर्फ नाना’ लोंढे यांच्या गुन्हेगारी साम्राज्य चालवण्याच्या क्लृप्त्या आता समोर आल्या आहेत. टोळीतील सदस्यांना एकनिष्ठ ठेवण्यासाठी सोन्याच्या अंगठ्यांची खैरात वाटणे आणि खंडणीतून आलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी अस्तित्वातच नसलेल्या बनावट डेअरीचा वापर करणे, या महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे नाशिक सत्र न्यायालयाचे (Nashik Sessions Court) न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी दोघांचाही मोक्काअंतर्गत जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

- Advertisement -

संशयित दीपक लोंढे (Deepak Londhe) याने खंडणी व बेकायदेशीर मार्गाने मिळवलेला काळा पैसा वैध दाखवण्यासाठी भूषण डेअरी नावाने बनावट कागदपत्रे (Fake Document) तयार केली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात प्रत्यक्ष जागेवर अशी कोणतीही डेअरी अस्तित्वातच नसल्याचे उघडकीस आले. या टोळीवर स्वतःचा वचक राहवा आणि सदस्यांनी निष्ठावान राहावे, यासाठी टोळीप्रमुख प्रकाश लोंढे याने आपल्या साथीदारांना चक्क २३ ते ३२ सोन्याच्या अंगठ्या वाटल्या होत्या. हा प्रकार टोळी सक्रियपणे चालवली जात असल्याचा मोठा पुरावा ठरला आहे. सातपूर येथील गोळीबाराच्या घटनेनंतर सहसंशयित प्रकाश लोंढे याच्या कार्यालयात लपले होते. तेथून पोलिसांनी प्रत्यक्ष शस्त्रे जप्त केली हाेती.

मध्यंतरी दीपक लोंढे याला नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी ३ तासांचा तात्पुरता जामीन (Bail) मिळाला होता. मात्र, त्या कालावधीतही त्याने लोकांना चिथावणी देऊन कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण केली होती. या गुन्ह्यात बार चालक संशयित बिपिन पुरुषोत्तम पटेल याच्यासह टोळीचे सदस्य संशयित संतोष शेट्टी पवार उर्फ जल्लाद आणि अमोल बाबासाहेब पगारे या तिघांना एप्रिल २०२६ मध्ये सशर्त जामीन मंजूर झाला. मे महिन्यात संशयित शुभम रामगिर गोसावी, निलेश श्रीकांत जोशी उर्फ बम्स, देवेश गजानन शेरताटे, दुर्गेश संतोष वाघमारे, शुभम चंद्रकांत निकम, राहुल सत्यविजय गायकवाड यांचा जामीन मंजूर झाला होता. त्यापाठोपाठ प्रकाश आणि दीपक यांनाही जामीनासाठी प्रयत्न सुरू केले हाेते. 

बत्तीस गुन्ह्यांची मालिका

संशयित प्रकाश लोंढे हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून दीपक लोंढे हा सर्व गुन्ह्यांचे नियोजन करणारा ‘मास्टरमाइंड’ असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. प्रकाश लोंढेविरुद्ध सरकारवाडा, सातपूर, अंबड आणि गंगापूर पोलिस ठाण्यात तब्बल १३, तर दीपकविरुद्ध १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

डिजिटल पुराव्यांमुळे जामीन नाकारला

या प्रकरणात अंबड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी आणि सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या पथकाने सबळ पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांकडे कॉल डिटेल रेकॉर्ड, मोबाईल स्थानकांचे पुरावे आणि सहसंशयितांचे कबुलीजबाब असा डिजिटल व भक्कम पुरावा उपलब्ध आहे. इतर काही सहसंशयितांना अटींवर जामीन मिळाला असला, तरी लोंढे पिता-पुत्राचा या गुन्हेगारी जाळ्यात मुख्य सहभाग असल्याने न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.

ताज्या बातम्या

मी आता जास्त काम करु शकत नाही; नागपुरातील कार्यक्रमात नितीन गडकरींच्या...

0
नागपुर । Nagpur मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या आणि खाते बदलाच्या राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू असतानाच, दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. पंतप्रधान...