नाशिक | प्रतिनिधी | Nashik
उपनगर पोलिसांच्या (Upnagar Police) हद्दीतील समतानगर आणि राहुल नगर परिसरात एक गंभीर घटना घडली आहे. गेल्या १० वर्षांपासून मनोरूग्ण असलेल्या एका ३५ ते ३६ वर्षीय तरुणाचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू (Death) झाला आहे. सनी भालेराव असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पोलीसांनी दोघा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल (रविवारी) रात्री अंदाजे आठ वाजेच्या सुमारास राहुल नगर परिसरात (Rahul Nagar Area) ही घटना घडली.मृत सनी भालेराव हा समतानगर येथून राहुल नगर परिसरात आला होता. तो समोर दिसेल त्याला विनाकारण मारहाण करत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यादरम्यान त्याने जमिल शेख यांना पकडले आणि घट्ट पकडून ठेवत मारहाण करण्यास सुरुवात केली.
जमिल शेख यांना सनीच्या तावडीतून सोडवण्यासाठी परिसरातील नागरिक पुढे आले. नागरिकांनी संतापाच्या भरात सनीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्यानंतर नातेवाईकांनी सनीला बिटको रुग्णालय (Bitco Hospital) आणि नंतर पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटना समजताच पोलिसांनी या प्रकरणी संशयित जमिल शेख आणि त्यांच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील कायदेशीर कारवाई व गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्याचे काम सुरू आहे.




