नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मुंबईतील (Mumbai) वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यक्रमापूर्वी बनावट पीएमओ अधिकारी रोहन पारेख आणि त्याच्या खाजगी अंगरक्षकाला अटक (Arrested) करण्यात आल्यानंतर, पुढील तपासात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची तार थेट नाशिकशी (Nashik) जोडली गेली आहे.
अटक करण्यात आलेला संशयित रोहन पारेखचा खाजगी शस्त्रधारी अंगरक्षक दिलीप राजाराम कुंडे (वय ४९) हा देवळाली कॅम्पजवळील लहवित (जि. नाशिक) येथील मूळ रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिक शहर व बीकेसी पोलिसांच्या (Police) प्राथमिक चौकशीत या प्रकरणाबाबत काही बाबी समोर आल्या आहेत. दिलीप कुंडे हा मूळचा लहवितचा असला तरी त्याची पत्नी येथेच वास्तव्यास आहे, असे समजते.
कुंडे आणि त्याच्या पत्नीमध्ये (Wife) गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू असून त्यांच्यात पटत नसल्याची माहिती पाेलिसांच्या स्थानिक तपासात समोर येत आहे. कुंडेची पार्श्वभूमी, त्याचे कौटुंबिक संबंध आणि त्याच्याकडे आढळलेल्या परवानाधारक शस्त्राचा मूळ स्रोत तपासण्यासाठी मुंबईचे बीकेसी पोलीस पथक लवकरच नाशिक आणि देवळाली कॅम्प परिसरात दाखल होणार असल्याचे समजते.
शस्त्राचा परवाना व पार्श्वभूमी रडारवर
कुंडे याच्याकडे ३२ बोरचे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतुसे आढळली होती. त्याने हा शस्त्राचा परवाना कुठून, तसेच तो मुंबईतील रोहन पारेखच्या (Rohan Parekh) संपर्कात कसा आला, याबाबतची माहिती नाशिक पोलीसही गोळा करत आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यासारख्या हाय-सिक्युरिटी झोनमध्ये बनावट आयडी वापरून घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीत नाशिकच्या रहिवाशाचा थेट सहभाग आढळल्याने स्थानिक गुप्तचर विभाग आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.




