नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा एकदा प्लॉट माफियांचे काळे रॅकेट समोर आले असून जळगावच्या (Jalgaon) एका व्यावसायिकाला तब्बल २२ लाख ५७ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. स्वस्तात प्लॉट देण्याचे आमिष दाखवत बनावट मालक उभा करणे, खोटे दस्तऐवज तयार करणे आणि विश्वास संपादन करून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार समोर आल्याने शहरातील जमीन व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित आरोपी राजू उर्फ प्रशांत बडगुजरला सोमवारी रात्री अटक (Arrested) करण्यात आली आहे.
दरम्यान, मंगळवारी न्यायालयात (Court) हजर केले असता बडगुजरला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या प्रकारामुळे प्लॉट माफियांचे रॅकेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.भालचंद्र यशवंत चौधरी (वय ५५, रा. एम.जे. कॉलेजजवळ, जळगाव) यांनी गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीनुसार, आरोपी राजू उर्फ प्रशांत बडगुजर, रतन ससाणे आणि इतर साथीदारांनी संगनमत करून नाशिक येथील गंगापूर शिवारातील (Gangapur Shivar) प्लॉट विक्रीच्या नावाखाली मोठा आर्थिक घोटाळा केला. ङ्गफिर्यादीला ओळखीचा आणि खात्रीशीर प्लॉट असल्याचे सांगून आरोपींनी वारंवार बैठका घेत विश्वास संपादन केला. आज घेतला नाही तर दुसरा ग्राहक तयार आहे असा दबाव टाकत लाखो रुपये रोख, बँक ट्रान्सफर आणि चेकद्वारे उकळले.
आरोपींनी (Suspected) प्लॉटचे बनावट दस्तऐवज, खोटे मालक आणि बोगस व्यवहार दाखवत तब्बल २२ लाख ५७ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही प्लॉटची नोंदणी न करता आरोपींनी टाळाटाळ सुरू ठेवली. संशय वाढल्यानंतर फिर्यादीने स्वतः चौकशी केली असता संबंधित प्लॉटचा मूळ मालक वेगळाच असल्याचे समोर आले. तसेच आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून संगनमताने फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिक निरीक्षक निखिल पवार पुढील तपास करत असून आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे.
शहरात पुन्हा एकदा प्लॉट माफिया सक्रिय झाल्याची चर्चा रंगली असून नागरिकांनी कोणताही मालमत्ता व्यवहार करताना ८ कागदपत्रांची सखोल पडताळणी करावी. बडगुजर विरोधात इतर पोलीस ठाण्यातही फसवणूकीच्या तक्रारी आढळून आल्या आहेत. बडगुजर व त्याच्या साथीदारांविरोधात काही तक्रारी असतील तर नागरिकांनी पुढे यावे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
अशोक शेरमाळे, व.पो. निरीक्षक गंगापूर
अशा प्लॉट माफियांमुळे नाशिकची प्रतिमा मलीन होत आहे. ८ नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यास कोणी तयार होत नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याबरोबरच नाशिकची प्रतिमा उंचावण्यासाठी अश्या प्लॉट माफियांचा कायद्याचा बालेकिल्ला करत कडक शिक्षा होणे गरजेचे आहे.
भालचंद्र चौधरी, फिर्यादी, जळगाव




