Monday, August 31, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर; आता...

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर; आता ‘या’ तारखेला होणार दोन्ही बाजूंचा युक्तिवाद

नाशिक | Nashik

- Advertisement -

महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यांत अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या जामीन अर्जावरील नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात (Nashik District and Sessions Court) आज (दि.३१) रोजी सुनावणी पार पडणार होती. परंतु, खरातचे वकील वेळेवर उपस्थित राहू न शकल्याने न्यायालयाने ही सुनावणी १६ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं?

आज (सोमवारी) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. अजय मिसर (Adv. Ujjwal Nikam and Adv. Ajay Misar) न्यायालयात हजर झाले. त्यानंतर आरोपीचे वकील ॲड. राहुल कासलीवाल यांच्या नावाचा पुकारा करण्यात आला. मात्र, ते न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यांच्या सहकाऱ्यांनी अर्ध्या तासाचा वेळ मागितला; परंतु वेळेत हजेरी न लागल्यामुळे न्यायालयाने (Court) सुनावणी १६ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. आता या पुढील तारखेला दोन्ही बाजूंकडून प्रत्यक्ष युक्तिवाद केला जाईल.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम पहिल्यांदाच कोर्टात

दरम्यान, या प्रकरणात सरकारी वरील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ॲड. उज्ज्वल निकम यांनी प्रथमच कोर्टात हजेरी लावली. सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की, अशोक खरातविरोधात एसआयटीने लैंगिक अत्याचाराचे आठ गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी सहा गुन्हे सत्र न्यायालयात वर्ग झाले असून, दोन गुन्हे मॅजिस्ट्रेट कोर्टात आहेत; जे लवकरच सत्र न्यायालयात वर्ग होतील. यातील एका गुन्ह्यात आरोपीने जामिनाची (Bail) मागणी केली आहे. मात्र, खरात हा पीडित महिलांच्या मनात भीती निर्माण करून त्यांचा लैंगिक छळ करत होता, याचे भक्कम पुरावे आम्ही न्यायालयासमोर सादर केले आहेत. खरातला कोणत्याही परिस्थितीत जामीन देऊ नये, अशी ठाम भूमिका सरकारने घेतली आहे, असे निकम यांनी सांगितले.

खरातवर एकूण १७ गुन्हे दाखल

भोंदूबाबा अशोक खरातवर नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. यातील १२ मुख्य गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला असून तपासात नवनवीन खुलासे होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कारागृहात असलेल्या खरातच्या जामिनावर आता १६ सप्टेंबर रोजी कोर्ट काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

सोयाबीन, तूर आणि कपाशीवर रस शोषणाऱ्या किडीचा हल्ला; पावसाच्या खंडामुळे खरीप...

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यात चालू खरीप हंगामात ९९.०३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या, तरी ऑगस्ट महिन्यांतील पावसाच्या मोठ्या खंडामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. पावसाने दिलेल्या...