नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जगातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर देवस्थानमध्ये व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त पुरुषोत्तम मधुकर कडलग याला अटक (Arrested) केली असून, या कारवाईमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. कडलग हा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्याध्यक्षदेखील असल्याने या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे.
फिर्यादी आनंदा सुरेश मेहेंदळे (रा. टकलेनगर, पंचवटी) हे ११ एप्रिल राेजी मित्रासह दर्शनासाठी (Darshan) आले होते. त्यावेळी संशयित गोटीराम पेहरे याने १० मिनिटांत ‘व्हीआयपी’ दर्शन करून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तीन हजार रुपये उकळले. कोणतीही अधिकृत पावती न देता भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात बीएनएस कलमांन्वये गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा केवळ एक-दोन भाविकांचा विषय नसून हे एक रॅकेट आहे. विश्वस्त कडलग हा पुतणे अभिषेक आणि ओम कडलग यांच्या मदतीने एजंटमार्फत भाविकांशी संपर्क साधायचा. भाविकांच्या आर्थिक स्थितीनुसार पाच, तीन व दाेन हजार रुपये प्रति भाविक असा ‘रेट’ ठरवून अनधिकृतपणे दर्शन घडवत हाेते. यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल(एमएसएफ) सुरक्षा रक्षकांचा आणि बनावट एन्ट्री रजिस्टरचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळाबाजार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग ताब्यात
लुटमारीचे गणित असे….
चार महिन्यांत साडेतीन कोटींचा आकडा समाेर येत असून रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार, दर्शनासाठी केवळ अर्ध्या तासात ४ भाविकांकडून ९ हजार रुपये उकळले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. याच गणितानुसार या घोटाळ्याची (Scam) व्याप्ती पाहिली तर ती चक्रावून टाकणारी आहे. पहाटे चार ते रात्री नऊ असे अठरा तास मंदिर खुले असते. वरील हिशेबानुसार एक तासांत आठ भाविकांचे सरासरी १८ हजार रुपये हाेतात. यात १८ तासांच्या गणितानुसार दरराेज १४४ भाविकांचे ३ लाख २४ हजार रुपये हाेतात. म्हणजे एका महिन्याची अंदाजित लूट ९७ लाख २० हजार रुपये इतकी आढळते. म्हणजेच, मागील ४ महिन्यांचा अंदाजित घोटाळा तीन काेटी ८८ लाख ८० हजार रुपयांपर्यंत पाेहाेचला आहे.
न्यायालयीन कोठडी आणि पुढील तपास
या प्रकरणात सहायक सरकारी अभियोक्ता जागृती ठाकरे यांनी युक्तिवाद करत संशयितांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने संशयित कडलग याला २० एप्रिल २०२६ पर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती बडे मासे गळाला लागतात आणि जमा झालेली कोट्यवधींची रक्कम कुणाकुणाच्या खिशात गेली, याचा शोध सुरु आहे. या प्रकरणामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या प्रतिमेला तडा गेला आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणी पुरुषोत्तम कडलग, गोटीराम पेहरेला पोलीस कोठडी
अभिषेक आणि ओम कडलग यांना अटक
या प्रकरणातील संशयित गोटीराम पेहरे याला अटक केल्यानंतर सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक करण्यात आली होती. तर पुरुषोत्तम कडलगचे पुतणे अभिषेक आणि ओम कडलग हे फरार होते. यानंतर त्यांना देखील काल (मंगळवारी) रात्री ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची अधिक चौकशी केली जाणार आहे. पुतण्यांच्या मध्यस्थीनेच पुरुषोत्तम कडलग हे दर्शनाच्या काळाबाजाराचे रॅकेट चालवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.




