नाशिक | Nashik
त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविकांना व्हिआयपी दर्शनाचे आमिष दाखवून फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार (दि.११) रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गोटीराम मनाजी पेहरे (रा. खडकवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) आणि अभिषेक कडलग (रा. त्र्यंबकेश्वर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या अभिषेक कडलग फरार असून, त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान याप्रकरणात त्र्यंबकेश्वर पोलीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच गोटीराम पेहरेलाही पोलीस कोठडी झाली आहे. न्यायमूर्ती ए.जी. बेहरे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली
हे देखील वाचा : Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळाबाजार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग ताब्यात
नाशिक सत्र न्यायालयाने पुरुषोत्तम कडलग आणि गोटीराम पेहरे यांना सात दिवसांची म्हणजे (दि.२० एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी सरकारी वकिलांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानची व्याप्ती मोठी असून, या प्रकरणाचा तपास करणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच विश्वस्त पदाचा गैरवापर करून हे रॅकेट चालवले जात असल्याचा संशय व्यक्त करत कडलग यांना १० दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. दुसरीकडे संशयित आरोपीच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावला. त्यामुळे आता कडलग आणि पेहरे यांना २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या कार्यक्रमाला IG कराळेंची उपस्थिती; अंजली दमानियांनी फोटो, Video शेअर करत केला गंभीर आरोप
दरम्यान, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, “गेल्या अनेक दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये पैसे घेऊन दर्शन दिले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी एक ‘स्टिंग ऑपरेशन’ (Sting Operation) राबविण्यात आले. यात पोलीसच भाविक बनून गेले होते. त्यामध्ये तत्काळ दर्शन व्हावे यासाठी काही एजंट काम करत होते. यात एका भाविकाकडून ३ हजार ते १२ हजार रुपये घेतले जात असल्याचे पुराव्यासह समोर आले. या कारवाईत एका एजंटला ताब्यात घेतल्यानंतर त्याने या लुटीचे कनेक्शन विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्याशी असल्याचे सांगितले. त्यानंतर देवस्थानच्या अध्यक्ष आणि न्यायाधीश यांच्याकडून कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर कडलग यांना अटक करण्यात आली”,असे त्यांनी म्हटले.
इतर विश्वस्तांचीही होणार चौकशी
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या संपूर्ण रॅकेटमध्ये वेगवेगळे लोक असून, आणखी काही ट्रस्टी असतील तर चौकशी केली जाईल. या प्रकरणात विश्वस्तांचे दोन नातेवाईक आणि एक एजंट अटकेत असून, या व्यतिरिक्त काही लोक आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. ज्यांनी विश्वस्तपदाचा गैरवापर केला, त्या सगळ्यांची चौकशी होणार असल्याचे, सांगितले.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरात-पोफळेचे सोलापूर कनेक्शन; अकरा एकर जमिनीचा खरेदी दस्त उघड, पत्नीच्या नावे कोट्यवधींची माया?
रक्कम महत्त्वाची नसून अन्य काही लोकांचा सहभाग पडताळणे आवश्यक
यावेळी सरकारी अधिवक्त्यांनी युक्तिवाद करतांना सांगितले की, ‘देवस्थान १२ ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. देवदर्शनासाठी विश्वस्त बनावट व्यक्तीच्या नावाने नोंदणी करून भोळ्या-भाबड्या नातेवाइकांची फसवणूक करतात. नातेवाइकांच्या नावाने ही टोळी चालवली जाते. यात रक्कम महत्त्वाची नसून यात आणखी काही लोकांचा सहभाग आहे का? ते पडताळणे आवश्यक आहे. जगभरात त्र्यंबकेश्वरची वेगळी ओळख असून काही विधी केवळ त्र्यंबकेश्वरलाच होतात. आधीच नाशिकचे नाव खराब होत असताना त्यात ही एक भर पडली आहे”, असे त्यांनी म्हटले.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंता सुरेश मेहंदळे (वय ४६, रा. नाशिक) हे त्यांच्या मित्रासह ११ एप्रिल रोजी दुपारी मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी २०० रुपयांचा देणगी दर्शन पास घेतला होता. रांगेत उभे असताना संशयित आरोपी गोटीराम मनाजी पेहरे (रा. खडकवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) याने त्यांना “१० मिनिटांत व्हीआयपी दर्शन करून देतो” असे सांगून संपर्क साधला. यानंतर आरोपीने ३ हजार रुपयांत व्हीआयपी दर्शन घडवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर दुसरा संशयित आरोपी अभिषेक कडलग (रा.त्र्यंबकेश्वर) याच्या मदतीने फिर्यादीला मंदिरात प्रवेश देऊन दर्शन घडवण्यात आले. दर्शनानंतर मंदिराबाहेर आल्यावर संशयित आरोपीने फिर्यादीकडून ३ हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. मात्र, देवस्थान ट्रस्टकडून अशा प्रकारची कोणतीही अधिकृत व्हीआयपी सेवा नसतानाही पावती न देता पैसे (Money) घेतल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले होते.या प्रकरणात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी गोटीराम मनाजी पेहरे आणि अभिषेक कडलग (पुरुषोत्तम कडलगचा पुतण्या) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गोटीरामला तात्काळ अटक करण्यात आली होती तर अभिषेक कडलग सध्या फरार आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : महिलेकडून तरुणाची हत्या; कोयत्याने केले सपासप वार




