नाशिक | Nashik
त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी आलेल्या भाविकाची व्हीआयपी दर्शन (VIP Darshan) करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार शनिवार (दि.११) रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील संशयित आरोपी गोटीराम मनाजी पेहरे (रा. खडकवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) यास अटक करण्यात आली होती. तर दुसरा संशयित अभिषेक कडलग (रा. त्र्यंबकेश्वर) हा फरार झाला होता. त्यानंतर आता या प्रकरणात नाशिक पोलिसांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police) अटक केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात देवदर्शनाच्या (Trimbakeshwar Darshan) नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी तपास करत असताना त्र्यंबकेश्वर पोलिसांना या काळ्याबाजारामध्ये विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांचा सहभाग असल्याचे धागेदोरे हाती लागले होते. त्यावरून पोलीसांनी सोमवारी रात्री पुरुषोत्तम कडलग यांना अटक केली. मंदिर संस्थानच्या विश्वस्तानेच अशा प्रकारे दर्शनाचा बाजार मांडल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या काळ्याबाजारात अजून कोणाचा समावेश आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, थेट विश्वस्तावरच कारवाई झाल्याने मंदिर प्रशासनातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील काय म्हणाले?
या प्रकरणाची अधिक माहिती देतांना नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) म्हणाले की, “त्र्यंबकेश्वर येथे देशविदेशातून भाविक दर्शनासाठी येतात. यात २०० रुपये व्हिआयपी दर्शनासाठी ट्रस्टची फी आहे. त्यामध्ये तत्काळ दर्शन व्हावे यासाठी काही एजंट काम करत होते. यासाठी ३ हजार ते १२ हजार रुपये घेत होते, असे आम्हाला कळले. मंदिर समितीचे अध्यक्ष आणि न्यायाधीश यांच्याकडून कारवाईचे आदेश मिळाले होते. त्यानंतर आम्ही स्टिंग ऑपरेशन करत भाविकांना ३००० रुपये घेऊन कसे लुटले जाते याचे रेकॉर्डिंग केले. भाविकांची आर्थिक लुट केल्याप्रकरणी काल रात्री मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये वेगवेगळे लोक असून, आणखी काही ट्रस्टी असतील तर चौकशी केली जाईल”, असे त्यांनी म्हटले. या प्रकरणात विश्वस्तांचे दोन नातेवाईक आणि एक एजंट अटकेत असून, या व्यतिरिक्त काही लोक आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. ज्यांनी विश्वस्तपदाचा गैरवापर केला, त्या सगळ्यांची चौकशी होणार असल्याचे” पाटील यांनी स्पष्ट केले.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंता सुरेश मेहंदळे (वय ४६, रा. नाशिक) हे त्यांच्या मित्रासह ११ एप्रिल रोजी दुपारी मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी २०० रुपयांचा देणगी दर्शन पास घेतला होता. रांगेत उभे असताना संशयित आरोपी गोटीराम मनाजी पेहरे (रा. खडकवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) याने त्यांना “१० मिनिटांत व्हीआयपी दर्शन करून देतो” असे सांगून संपर्क साधला. यानंतर आरोपीने ३ हजार रुपयांत व्हीआयपी दर्शन घडवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर दुसरा संशयित आरोपी अभिषेक कडलग (रा.त्र्यंबकेश्वर) याच्या मदतीने फिर्यादीला मंदिरात प्रवेश देऊन दर्शन घडवण्यात आले. दर्शनानंतर मंदिराबाहेर आल्यावर संशयित आरोपीने फिर्यादीकडून ३ हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. मात्र, देवस्थान ट्रस्टकडून अशा प्रकारची कोणतीही अधिकृत व्हीआयपी सेवा नसतानाही पावती न देता पैसे (Money) घेतल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले होते.या प्रकरणात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी गोटीराम मनाजी पेहरे आणि अभिषेक कडलग (पुरुषोत्तम कडलगचा पुतण्या) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गोटीरामला तात्काळ अटक करण्यात आली होती तर अभिषेक कडलग सध्या फरार आहे.




