नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना नाशिकरोड पोलीस ठाण्यातील (Nashik Road Police Station) गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे २८ चाकू, कोयता, दोरी असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांच्या (Police) या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले की, नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी विशाल पाटील यांना माहिती मिळाली की, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पळसे गाव टेंभी मळा येथे राहणाऱ्या ज्ञानेश्वर गायधनी यांच्या शेतामध्ये काही संशयित व्यक्ती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत.
गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन मध्यरात्रीच्या सुमारास गायधनी यांच्या मक्याच्या शेतीमध्ये (Farm) संशयितांचा शोध घेतला असता लपून बसलेले मुंबई कल्याण येथील रवीकुमार भोई, शिवा विक्रम वैदू तर जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) विष्णू शंकर भोई व आकाश गोपाळ वैदू हे पळण्याचा तयारीत असताना पोलिसांनी मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेला श्याम विष्णू भोई हा पळून जाण्यात यशस्वी ठरला.
ताब्यात घेतलेल्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून २८ धारदार चाकू, एक कोयता, मिरची पूड, सुती दोरी असे साहित्य मिळाले असून ते दरोडे टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून न्यायालयात त्यांना उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, सदरची कामगिरी पोलीस कामगिरीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, किरण कोरडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, अविनाश देवरे, नितीन भामरे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, विशाल कुवर, समाधान वाजे, धीरज बिडकर, योगेश रानडे, नीलेश कुन्हे यांनी केली. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.




