नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आमदार तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दुर्गम पेठ तालुक्यातील (Peth Taluka) बीएसस्सी पदवीधर तरुणास अखेर अटक (Arrested) करण्यात आली. ‘स्पेशल छब्बीस’ चित्रपटात दाखवण्यात आलेल्या सीबीयआयच्या बनावट छापेमारीची नक्कल करून या पदवीधराने आयकर अधिकारी असल्याचे भुजबळांच्या स्वीय सहाय्यकास (Self Assistance) सांगितले आणि त्र्यंबकेश्वर येथील भुजबळांच्या फार्महाऊसवरील घबाडावर इन्कमटॅक्स विभाग रेड करणार असल्याचे सांगून सेटलमेंटसाठी एक कोटी साठ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र गुन्हे शाखा युनिट एकने कॉल लोकेशनच्या जोरावर संशयितास रंगेहाथ पकडले.
राहुल दिलीप भुसारे (वय-२७, रा. हनुमान मंदिराशेजारी, करंजाळी, ता. पेठ) असे संशयित पदवीधराचे (Graduate) नाव आहे. तो सध्या बेरोजगार आहे. त्यामुळे पैसे कमावण्यासाठी काहीतरी ‘वेगळ’ करावं लागेल, या विचारात असतानाच, त्याने मित्र मंडळी काही ओळखीतून आ. भुजबळ यांचा मोबाईल क्रमांक (Mobile Number) मिळविला. त्यानंतर एप्रिल महिन्यांत या नंबरवर संपर्ककरुन भुजबळांनी हा मोबाईल नंबर स्वीय सहायक संतोष गायकवाड यांच्या मोबाईलवर डायव्हर्ट केल्याचे समजले. तरी राहुलने न डगमगता गायकवाड यांना फोन करुन मी आयकर खात्याचा अधिकारी आहे, लवकरच भुजबळांच्या त्र्यंबकेश्वरातील (Trimbakeshwar) फार्म हाऊसवरील मालावर आयटीची रेड पडणार आहे, आयटीचे वरिष्ठ अधिकारी माझ्या ओळखीचे असून प्रकरण मिठ्ठवायचे असेल तर एक कोटी साठ लाख रुपये लागतील, असे सांगितले.
यानंतर गायकवाड यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर, अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपास युनिट एकने सुरु केला. दरम्यान, भुसारे याने गायकवाड यांना गुजरातमधील धरमपूर येथे एक कोटी रुपये घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार काही डमी नोटा व खरे पैसे एकत्र करून गायकवाडांसह साक्षीदार व युनिट एकचे पथक धरमपूरला गेले. मात्र, भुसारेला संशय आल्याने त्याने प्लॅन बदलला. त्यामुळे पोलीस व गायकवाड नाशिककडे परतण्याच्या तयारीत होते. तेव्हा भुसारे याने साक्षीदार नरेंद्र सोनवणे यांना फोन करुन पैसे करंजाळी येथील हॉटेल रितम व्हॅली येथे आणण्यास सांगितले.
तेव्हा पथक तेथे पोहोचले व सापळा रचला. यानंतर भुसारे दुचाकीवरुन आला व त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या सोनवणे यांच्याकडून पैशांची बँग मागितली. बॅग हातात येताच भुसारे याने पळ काढला. मात्र पथकाने (Squad) दुचाकीवरुन त्याचा पाठलाग करून डमी व खऱ्या नोटांसह ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचा ताबा अंबड पोलिसांकडे (Ambad Police) देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार रमेश कोळी, विशाल काठे, देविदास ठाकरे, नाजीमखान पठाण, रोहिदास लिलके, आप्पा पानवळ, नितीन जगताप, राहुल पालखेडे यांनी केली.
डील एक कोटींपर्यंत
भुसारे याने गायकवाड यांना फोन केल्यावर फार्म हाऊसवर रेड टाकण्याची कारवाई शिथिल करण्यासाठी १ कोटी ६० लाखांची मागणी केली. मात्र, पोलीस व गायकवाड यांनी भुसारेला खेळवून ठेवत ही रक्कम एक कोटी रुपयांपर्यंत कमी केली व तत्काळ आणून देण्याचे सांगत तोपर्यंत रेड करू नका असे सांगितले. मात्र, पोलिसांनी मोबाईल लोकेशन व इतर तांत्रिक विश्लेषण करून भुसारेचा माग काढला.
ट्रक ड्रायव्हरचे मोबाईल वापरले
मुसारे याने स्वतःचा मोबाईल न वापरता वेगवेगळे दहा ते बारा मोबाईल नंबर वापरले. हे नंबर पडताळले असता ते विविध राज्यातील ट्रकचालकांचे व काही अनोळखींचे आढळून आले. कारण भुसारे याने पेठ, करंजाळी व विविध भागातील हॉटेल व ढाब्यांवर थांबलेल्या ट्रकचालकांचे मोबाईल ‘अर्जेंट फोन’ करण्याच्या बहाण्याने ताब्यात घेत गायकवाड व सोनवणे यांना फोन केले. त्यामुळे नेमके लोकेशन शोधण्यात पोलिसांना काहीसा वेळ लागला.
संशयित भुसारे याने हॉटेल व्यवसाय केला परंतु त्यामध्ये अपयश आल्याने त्याने हा डाव आखल्याचे समोर येत आहे. भुसारे हा अविवाहित असून, त्याने गुगल व इतर सर्च इंजिनवरून ऑनलाईन पद्धतीने भुजबळांची माहिती मिळवत गुन्हा केल्याचे निष्पन्न होत आहे.
मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे-१
माझ्या मोबाईल क्रमांकावर आलेले कॉल स्वीय सहाय्यक गायकवाड हे उचलतात. त्यांनी ‘साहेबांकडे काय काम आहे’ असे विचारल्यावर संशयिताने खंडणीची मागणी केली. शहर पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली आहे. एप्रिल महिन्यात त्र्यंबकेश्वरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. त्यानंतर हे कॉल्स सुरू झाले होते.
छगन भुजबळ, आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री