नाशिक | प्रतिनिधी | Nashik
प्रेमसंबंध ठेवताना तरुणीस विवाहाचे आमिष दर्शवून वारंवार लैंगिक अत्याचार (Rape Case) केल्यानंतर पीडितेसह तिच्या पतीला मारण्याची धमकी देणाऱ्या शहर पोलीस दलातील (City Police) दंगल नियंत्रण पथकाच्या (आरसीपी) अंमलदाराविरुद्ध इंदिरानगर पोलिसांत बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अभी उर्फ चंद्रकांत शंकर दळवी (वय ३५, रा. केतकीनगर, म्हसरूळ) असे संशयित पोलिसाचे (Police) नाव आहे. इंदिरानगर पोलिसांच्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा परिसरातील पंचवीस वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील आरसीपीत नेमणुकीस असलेल्या अभी दळवी याने सन २०२० ते २३ मे २०२५ या कालावधीत तिचा छळ करून बलात्कार केला. राणेनगर येथील कशिश लॉज, सातपूर येथील सिटाडेल, डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील लॉजमध्ये पीडितेवर अत्याचार केले. याप्रकरणी पीडितेने १५ मे रोजी पोलीस ठाणे गाठून रात्री नऊ वाजेच्या सुमारास फिर्याद दिली.
दरम्यान, संशयिताने सन २०२० मध्ये पीडितेशी ओळख करुन तिच्याशी कौटुंबिक संबंध निर्माण करुन तिला प्रेमाच्या (Love) जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी नेत शारीरिक संबंध ठेवले. यासह तिच्याशी विवाहाचा दिखावा करुन घरी नांदण्यास नेले नाही. ‘माझ्या घरच्यांची विवाहाला संमती नाही’, असा दावा करून फसवणूक (Fraud) केली.
निलंबन होणार?
या गुन्ह्यामुळे संशयिताचे डिपार्टमेंटमधून निलंबन होण्याची शक्यता आहे. दळवीवर खात्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून त्याने याआधी पोलिसाच्या वर्दीत शेकडो ‘रील्स’ करुन प्रसिद्ध केले आहेत. इन्स्टा व फेसबुकवर त्याचे शेकडो फॉलोअर्स असून त्यामुळे तो पोलीस दलात कायम चर्चेत असायचा. आता त्याच्यावर गंभीर गुन्हा नोंद झाल्याने आयुक्तालयासर मित्रपरिवारात खळबळ उडाली आहे.