नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील ‘कुरिअर बॉय’ म्हणून काम करणारा तरुणच अमली पदार्थांच्या (MD Drugs) जाळ्यात अडकलेला आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) इंदिरानगर परिसरातील (Indiranagar Area) घरावर मध्यरात्री छापा टाकून सात ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) जप्त केले. या प्रकरणी संशयित वैभव पांडुरंग आव्हाड (२५) याला अटक करण्यात आली असून, तो एमडीचा साठा नशेसाठी तसेच विक्रीसाठी ठेवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशानुसार शहरात अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरु येत आहे. गुन्हे उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस पथक कारवाई करत आहे. आतापर्यंत ६७ हून अधिक गुन्हे नोंदविण्यात आले असून, एमडी तस्करीवर मोठ्या प्रमाणात आळा बसविण्यात यश आले आहे. मात्र नशेसाठी होणारी किरकोळ पातळीवरील खरेदी-विक्री अद्याप सुरू असल्याचे चित्र आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने संशयित वैभवचा माग काढला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी (दि. १८) मध्यरात्री चेतना नगरातील राधाकृष्ण अपार्टमेंट येथे सापळा रचण्यात आला. सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे आणि पथकातील अंमलदारांनी घरात झडती घेतली.
यावेळी नुकताच पोलिस दलात दाखल झालेला श्वान ‘जॅक’ही कारवाईत सहभागी होता. त्याने घरातील कानाकोपऱ्यात शोध घेत काही क्षणांत एमडीचा साठा हेरला. छाप्यात ३५ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम एमडी व सुमारे २५ हजार रुपयांचा अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुधवारी (दि. १९) पहाटे इंदिरानगर पोलिस ठाण्यात वैभवविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कुठून आणले एमडी??
संशयिताने एमडी कोणाकडून खरेदी केले, त्यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा तपास सुरू असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली जात आहे. शहरात कुरिअर, डिलिव्हरी, विद्यार्थी आदी तरुणांमध्ये एमडीचे आकर्षण वाढत असल्याची बाब चिंताजनक मानली जात आहे. संशयिताच्या आईची चाैकशी हाेण्याची शक्यती आहे.





