नाशिक | प्रतिनिधी | Nashik
संघटीतपणे गुन्हेगारी कारवाईत सहभाग असलेल्या ॲड. प्रशांत जाधव यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील (Firing Case) संशयितांची मकोका (Mcoca) अन्वये पुन्हा चौकशी आरंभण्यात आली आहे. सध्या न्यायालयीन कोठडीनंतर (Judicial Custody) कारागृहात असलेल्या या सराईत संशयितांकडे गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी सखोल चौकशी सुरु केली असून मकोका न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्यामुळे गुन्हेशाखेने संशयिताचा ताबा घेतला आहे.
आकाश आनंदा सूर्यतळ, टक्या उर्फ सनी रावसाहेब पगारे, बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकोडे, प्रसाद संजय शिंदे, परिनय उर्फ अंकुश लक्ष्मण शेवाळे, मयूर चमन बेद अशी संशयितांची नावे आहेत. आरटीआय कार्यकर्ते अॅड. प्रशांत जाधव यांच्यावर १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सिडकोतील सावतानगर येथे संशयितांनी गोळीबार करुन मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी अंबड पोलिसात (Ambad Police) गुन्हा दाखल आहे. सुमारे दोन वर्षांनी या गुन्ह्याची उकल झाली होती.
दरम्यान, याप्रकरणी सहा संशयितांना अटक (Arrested) केली तर, संशयित दीपक सुधाकर बडगुजर यास न्यायालयाने अटकपूर्व जामीन (Bail) मंजूर केला आहे. संशयितांनी संगनमताने कटकारस्थान करून गुन्हा केला असल्याने तपासी अधिकारी सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या अहवालानुसार संशयितांविरोधात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) लावण्यात आला आहे.
संशयितांस कोठडी
या गुन्हयात तपासकामी संशयितांच्या पोलीस कोठडीची मागणी सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी विशेष मकोका न्यायालयाकडे केली. त्यावर आज (दि. २२) युक्तिवाद होऊन जिल्हा सत्र न्यायधीश नितीन जीवने यांनी संशयितांना २७ तारखेपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहातून संशयितांचा ताबा घेतला आहे.