नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरातील एका व्यावसायिकास फळांचे ‘एक्स्पोर्ट’ करण्यासह क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यावर ‘कमिशन’ देण्याचा दावा करून ८७ लाख ६६ हजार सहाशे चाळीस रुपयांना गंडा घालण्यात आला. व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरुन सोलापूरच्या चार संशयितांविरुद्ध मुंबई नाका पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. व्यवसायातून झालेल्या ओळखीचा चारही संशयितांनी गैरफायदा घेतल्याचा संशय आहे.
वडाळा रस्त्यावरील जयदिप नगरातील रहिवाशी हमीदरजा मूनिस्दीन खान (वय ४८) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश वसंत वराडे, विकास वराडे, अक्षय जाधव व नवनाथ केनगर (सर्व रा. सांगोला, सोलापूफू) या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. १५ नोव्हेंबर २०२१ ते २१ जुलै २०२४ पर्यंत खान यांनी संशयितांना फळ ‘एक्सपोर्ट’ सह ‘क्रिप्टो करन्सी’त गुंतवणुकीसाठी तब्बल १ कोटी २३ लाख ५२ हजार सहाशे चाळीस रुपये दिले. त्यानुसार ‘कमिशन’ म्हणून संशयितांनी खानला सुरुवातीला ३८ लाख ८६ हजार दहा रुपये दिले आहेत.
मात्र, काही महिन्यांनी कमिशन देण्यास संशयितांनी नकार दिला. त्यामुळे खान याने मूळ गुंतवणूक परत मागितली. त्यानुसार संशयितांनी फनास लाख, पंचवीस लाख, सतरा लाख व पंधरा लाख असे चार धनादेश दिले. त्यावर संशयितांची स्वाक्षरी न जुळल्याने एकही धनादेश वटला नाही. त्यामुळे खान यांनी पोलिसांत धाव घेत संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राम गोडे करत आहेत.
पाचपैकी तीन लाख गोठवले
आर्टिफिशिअल स्पोर्टग्रास देण्याच्या नावाखाली शहरातील एका व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. मुंबईतल्या एका इंटेरिअर कंपनीच्या नावाने व्यावसायिकाला संपर्क साधून विविध बैंक खात्यांमध्ये ५ लाख एकोणवीस हजार ४७४ रुपये घेण्यात आले. ६ ते १४ जानेवारी या कालावधीत हा प्रकार घडल्यानंतर व्यावसायिकाला कोणताही माल प्राप्त झाला नाही. त्यामुळे त्याने नाशिक सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून ज्या बँकेत पैसे जमा झाले. तेथे संपर्क साधून पाचपैकी ३ लाख दहा हजार ४६९ रुपये गोठवले आहेत. याप्रकरणी फसवणुकीची रकम वर्ग झालेल्या बैंक खातेधारकांसह व्हॉटसअॅप क्रमांक धारकांवर गुन्हा नोंद आहे.