नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सोशल मीडियावरील (Social Media) इन्स्टाग्राम रील्स आणि संवादापुरते उरलेले नसून, गुन्हेगारीचे नेटवर्क उभारण्यासाठीही त्याचा वापर कसा होतो, याचा प्रकार नाशिकमध्ये (Nashik) समोर आला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील (Nashik-Trimbakeshwar Road) तळेगाव येथील बंगल्यात उघडकीस आलेल्या बनावट नोटा प्रकरणातील सर्व पाचही संशयितांची ओळख ‘इन्स्टाग्राम’ या (Instagram) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाली होती. याच व्हर्च्युअल ओळखीचे रुपांतर प्रत्यक्ष कटकारस्थानात होऊन, १० लाखांच्या बदल्यात ३० लाख रुपयांचे आमिष दाखवत तब्बल १० लाखांना गंडा घालण्याचा हा प्लॅन रचल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी न्यायालयाने तेलंगणा व नाशिकच्या पाचही संशयितांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्थानिक संशयित गोकुळ दाते, हिरामण दाते आणि मच्छिंद्र घनदाट यांनी तेलंगणातील बनावट नोटा तयार करण्यात पटाईत असलेल्या अमरेश्वर आईथा व दासहरी सत्यइ यांना नाशिकमध्ये बाेलविले होते. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार केवळ बनावट नोटा छपाईचा नसून, आर्थिक फसवणुकीचा अधिक वाटतो, असा महत्त्वाचा खुलासा नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी केला आहे. संशयितांकडे (Suspected) छपाईसाठी लागणारी फारशी आधुनिक यंत्रसामग्री मिळालेली नाही. ते खऱ्या नोटांना केमिकल लावून शाई उमटवण्याचे नाटक करत हाेते. १० लाखांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात ३० लाख बनावट नोटा (Fake Currnency) देण्याचे भासवून, समोरच्या व्यक्तीची मूळ १० लाखांची रक्कम घेऊन पोबारा करण्याचाच त्यांचा मुख्य कट हाेता, असे तपासात समाेर आले आहे.
आधी कोणाला चुना लावला?
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या टोळीने नाशिकमधील या बनावापूर्वी आणखी कोणाकोणाला अशा प्रकारे केमिकलचा थर दाखवून १०-१० लाखांचा गंडा घातला आहे का? या दृष्टीने ग्रामीण पोलीस सध्या सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत. सोशल मीडियावरील अनोळखी लोकांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
कारवाईची सूत्रे
-अमरेश्वर आईथा (३७, हैदराबाद), दासहरी सत्यइ (३६, सिरसिल्ला-तेलंगणा), गोकुळ दाते (५६, गंगापूर), हिरामण दाते (५६, तळेगाव) आणि मच्छिंद्र घनदाट (सातपूर) हे पाच जण गजाआड
-१० लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणायच्या आणि त्या मोबदल्यात ३० लाखांच्या बनावट नोटा न्यायच्या, अशी हाेती डिल
-व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी बंगल्यावर धाड टाकत हा बनाव उधळून लावला.




