नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ऐन गणेशोत्सवात सरकारावाडा पोलिसांच्या (Sarkarwada Police) हद्दीतील सीबीएस येथे बेघर व्यक्तीच्या डोक्यात दगड व पेव्हरब्लॉक टाकून तिघा विधिसंघर्षितांनी निघृण खून (Murder) केला. ही घटना मंगळवारी (दि. २) दुपारी घडली. त्याचवेळी शरणपूर रोडवरील महापालिका मुख्यालया शेजारी शानू सैदाप्पा वाघमारे (वय २६) या तरुणाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह (Dead Body) आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले असून, मित्रांनीच त्याचा खून केल्याचा गंभीर आरोप कुटुंबाने केला आहे.
याबाबत रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस (Police) गुन्ह्यासंदर्भाने आवश्यक कार्यवाही करत होते. प्रकरणात तिघा तरुणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ठक्कर सीबीएसजवळील (CBS) बाजार रस्त्यालगत राहणारे तीन ते चार विधिसंघर्षित मुलेमुली व ५५ वर्षीय बेघर व्यक्तीत मंगळवारी दुपारी दोन वाजता क्षुल्लक तसेच मैत्रिणीला छेडल्याच्या रागातून वाद झाला. ताे क्षणार्धात टाेकाला पाेहाचून तिघा विधिसंघर्षित मुलांनी त्याच्या डाेक्यात दगड व पेव्हर ब्लाॅक टाकून खून केला. हा व्यक्ति रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थाराेळ्यात निपचित पडला असतानाच विधिसंघर्षित बालकांनी हातवारे करुन नाचगाणे केल्याचे काही पादचाऱ्यांनी चित्रित केलेल्या व्हिडीओतून समोर आले.
खून झालेला व्यक्ति बेघर व असल्याने त्याचे नाव उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात (Hospital) नेत शवविच्छेदनानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली. याप्रकरणी युनिट एकने तीन अल्पवयीन मुले ताब्यात घेत, त्यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. त्यांना बालन्याय मंडळासमाेर हजर करण्यात येणार आहे. सर्वच विधिसंघर्षित १३ ते १६ वयोगटातील आहेत.
मित्रांनीच हत्या केल्याचा दावा
मागील कुरापत काढून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप एका कुटुंबाने केला आहे. मंगळवारी (दि.२) पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास महापालिका मुख्यालयाशेजारी हा प्रकार घडल्याचे समजते. शानू वाघमारे (रा. कस्तुरबा नगर, होलाराम कॉलनीसमोर, नाशिक) असे मृताचे नाव आहे. शानू याला त्याच्या तीन ते चार मित्रांनी सोमवारी (दि.१) रात्री ८ वाजेच्या सुमारास ‘फिरायला जायचे आहे’, असे सांगून घरातून नेले. मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास ते संत कबीर नगर येथील एका मित्राच्या घरीही नेले. त्या मित्राला सोबत घेवून पुढे निघाले. मंगळवारी (दि.२) पहाटे ५ ते ५.३० वाजेच्या सुमारास राजीव गांधी भवन जवळील सिग्नलवरील रेमंड शोरूम येथे वॉचमन म्हणून मित्राकडे आले. याठिकाणी चार ते पाच मित्रांनी त्याच्याशी झटापट करुन मारहाण केली. त्यातील एका मित्राने त्याला धक्का दिल्याने, तो खाली कोसळला. अशा अवस्थेत त्याला त्याच्या मित्रांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. चक्कर येवून पडल्याने, तो बेशुद्ध झाल्याचा बनावही त्यांनी रचला. मात्र, डाॅक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद असून तिघा मित्रांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अंगावर जखमांच्या खुना
शवविच्छेदन अहवालात शानूच्या हातापायावर तसेच मानेवर, डोक्याच्या मागच्या बाजुस मारहाणीमुळे जखमांच्या खुना असल्याचे नमूद केले आहे. डॉक्टरांनी तसा अहवाल पोलिसांना सुपूर्द केला असून, सखोल तपासाअंती, गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वीच शानू आणि मित्रांमध्ये वाद झाल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. बदला घेण्यासाठी त्याची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, चाैकशीनंतर कार्यवाही केली जाणार आहे.




