नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चार दुर्दैवी घटनांमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. चेहडीशिव येथे कीटकनाशक सेवन करून एका ज्येष्ठ व्यक्तीने तर अंबड परिसरात (Ambad Area) तरुण, तरुणी व मध्यमवयीन व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. या चारही घटनांमुळे शहरात मानसिक तणाव, एकाकीपणातून टोकाचे निर्णय घेण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या (Nashik Road Police Station) हद्दीतील चेहडीशिवलगतच्या म्हसोबानगर येथे पोपट बबन गिते (वय ६२) यांनी शुक्रवारी (दि.९) सकाळी सुमारे दहा वाजता राहत्या घरात ‘रोगर’ हे कीटकनाशक प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. नाशिकरोड पोलिसांत नोंद करण्यात आली असून कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. १०) वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांनी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या. सिंहस्थनगर येथे राहणारा अनिल राजू इंगळे (वय २१) याने दुपारी एक वाजता घरात गळफास घेतला.
जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) दाखल के ले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तसेच, अंबडच्या दत्तनगरात संजय नागेश्वर सिंग (वय ५७) यांनी दुपारी दोनच्या सुमारास घरात गळफास घेत जीवन संपविले. त्यांनाही जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. तिसरी घटना शिवशक्ती चौकात घडली. छकुली भास्कर गवळी (वय २२) या तरुणीने सकाळी साडेदहा वाजता घरातील किचनमध्ये ओढणी बांधून गळफास घेतला. तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. या तिन्ही घटनांची नोंद अंबड पोलीस ठाण्यात झाली आहे. चौघांच्याही आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपास सुरू आहे.




