नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंबड (Ambad) येथील सेंट्रल वेअर हाऊसमधील व्यावसायिकांच्या मालाबाबत लिलावाचा निर्णय झाला असून प्रकरणात धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. त्यानुसार, दोघा परप्रांतीय व्यावसायिकांवर फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल झाला असून शहरातील वीस व्यापाऱ्यांना तीन कोटींचा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.
अंबड एमआयडीतील सेंट्रल वेअर हाऊस कॉर्पोरेशन (सीडब्ल्यूसी) भाडेतत्त्वावर घेतलेल्या उत्तरप्रदेशातील दोघा संशयितांनी बावीस लाख रुपयांचे भाडे थकविताच वेअर हाऊसच्या व्यवस्थापनाने सीडब्ल्यूसीतील कोल्ड स्टोरेजमधील वीस व्यापाऱ्यांचा सुमारे तीन कोटी रुपयांचा माला जप्त करुन लिलावात (Auction) काढला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात उत्तरप्रदेशातील दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
वैभव अग्रवाल, जतीन गुप्ता (रा. जि. वैशाली, उत्तरप्रदेश) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. विजय आनंदराव बच्छाव (६३, रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची अंबड औद्योगिक वसाहतीत गार्गी पॅकिंग इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. दरम्यान, सेंट्रल वेअर हाऊस हे संशयित अग्रवाल व गुप्ता यांच्या मे. आरजेव्हीएम प्रॉडक्ट प्रा.लि. या कंपनीने भाडेतत्त्वावर घेतले असून या गोदामातील कोल्ड स्टोअरेजमध्ये बच्छाव व इतर वीस व्यावसायिक विविध स्वरुपाचा माल ठेवतात. गरजेनुसार गोदामातून माल घेऊन जातात. त्यासाठी सर्वच व्यापारी गुप्ता व अग्रवाल यांच्या कंपनीला निर्धारित भाडेही देत होते.
दरम्यान, अग्रवाल व गुप्ता यांच्या कंपनीने वेअर हाऊसचे २२ लाख ९५ हजार ३१६ रुपये भाडे थकविले आहे. त्यामुळे वेअर हाऊसच्या अधिकाऱ्यांनी कोल्डस्टोरेजमधील माल व्यापाऱ्यांना (Merchants) देण्यास मनाई केली. तेव्हा व्यापाऱ्यांनी १६ जून २०२५ रोजी वेअर हाऊस गाठले. तेव्हा येथील सुरक्षा रक्षकाने त्यांना मनाई केली. तसेच, शिवीगाळ करीत धमकावले. याबाबत वेअर हाऊसच्या अधिकारी सोनाली गजबभिये यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी थकीत भाड्यामुळे गोदामातील माल जप्त केला असून, लिलावात विक्री केली जाणार असल्याचे सांगितले.
परंतु, वेअर हाऊसचे भाडे आधीच संशयितांना दिल्याचे सांगून व्यापाऱ्यांनी ‘आमची चूक’ नसल्याचे सांगितले. मात्र, वेअर हाऊस व्यवस्थापनाने भाड्याचा भरणाच झाला नसल्याचे सांगून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांची अडचण झाली असून दोघा संशयितांनी भाडे अदा केले असते तर, तीन कोटींचा माल जप्त होण्याची नामुष्की ओढावलीच नसती असे उघड होत आहे.
तीन कोटींचा माल
या गोदामात २०२४ पासून नाशिकमधील बच्छाव यांच्यासह मुकेश ठक्कर, शोल्क ट्रेडिंग कंपनी, बालाजी नटर्स जे.सी. शहा आणि कंपनी, विवेक गुप्ता, आनंद अॅण्ड कंपनी, निरमल एंटरप्राईजेस्, श्री सिद्धेश्वर एंटरप्राईजेस, गुलाबचंद कुंदलमल बेदमुथा, जय अंबे ट्रेडिग कंपनी, जयंतीभाई भगवानभाई पटेल, जय गुरुदेव ट्रेडिंग कंपनी, कोकणी मसाला, एस. आर. एंटरप्राईजेस, श्री स्वामी समर्थ ऑईल मिल, सिद्धेश्वर ड्रायफ्रुट, एफएनआय स्पायसेस, योगेश शिंदे, श्रद्धा सबुरी ट्रेडर्स, सोमनाथ किराणा या २० व्यापाऱ्यांचा सुमारे ३ कोटी रुपयांचा माल आहे.





