नाशिक | प्रतिनिधी | Nashik
वैद्यकीय शिक्षणातील (MBBS) प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर संशयितांनी ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमासाठी ‘नॉमिनी’ कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे सांगून पालकांकडून तब्बल ३१ लाख ७५ हजार रुपये उकळले आहेत. याबाबत नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणात दोन अनोळखी व्यक्तींनी विविध बँक खात्यांचा वापर करून फसवणूक (Fraud) केल्याचे तपासात उघड झाले आहे. शहरात गेल्या काही महिन्यात या स्वरुपाचे तीन प्रकार समोर आले आहेत.
फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलाला संशयित सायबर चोरटे प्रणव झा व राज मालतीया वैद्यकीय शिक्षणासाठी पुण्यातील बी. जे. मेडिकल या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. संपर्क साधून विश्वास संपादन करीत ‘नॉमिनी’ कोट्यातून प्रवेश देऊ, असे सांगत, सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या कारणांखाली नोंदणी, सीट कन्फर्मेशन, कॉलेज मॅनेजमेंट फी, डॉक्युमेंटेशन आदींच्या नावाखाली रक्कम मागविली. ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. असे एकूण ३१ लाख ७५ हजार रुपये हडप करण्यात आले.
प्रवेश न झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी विचारणा केली असता, संशयितांशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पालकांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदविली. आता दाखल गुन्ह्यानुसार, आर्थिक व्यवहारांचा सखोल डिजिटल ट्रेल तपासला जात आहे. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये (Nashik) मेडिकल प्रवेश फसवणुकीचा हा तिसरा गुन्हा आहे. यापूर्वी मुंबई नाका व इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत अशाच स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
नाशिकमधील फसवणूक प्रकरणे
१) मुंबई नाका पोलीस ठाणे (२०२२)
कोल्हापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून एमबीबीएस प्रवेश देण्याचे आमिष दाखवून ३४ लाख ६१ हजार रुपये उकळल्याप्रकरणी सचिन वामन म्हात्रे (डोंबिवली) व कल्पना रघुनाथ पाटील (नाशिकरोड) या संशयितांविरोधात गुन्हा दाखल आहे. प्रवेश न मिळाल्याने फसवणूक उघड झाली होती.
२) इंदिरानगर पोलीस ठाणे (२०२३)
शासकीय कोट्यातून एमबीबीएस प्रवेश देतो, असे भासवून १ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. संशयित संतोषकुमार हरीचंद्र पाणिग्रही (रा. ओडिशा) याच्याविरोधात गुन्हा नोंद असून लक्ष्मण तांबोळी (पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली होती.




