नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघा तडीपारांसह तिघा सराईतांना उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) पाठलाग करुन गजाआड केले आहे. जेलरोड (Jail Road) येथील ब्रह्मगिरी सोसायटीजवळील गार्डनच्या मोकळ्या जागेत (दि. ७) पहाटे अडीच वाजता ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून एक तलवार, दोरी, कोयता, मिरची पूड, स्क्रू ड्रायव्हर अशी घातक हत्यारे जप्त केली आहेत.
दीपक भाऊसाहेब जाधव उर्फ डेमू (वय २७, रा. लोखंडे मळा, जेलरोड), वैभव बाबजी पाटेकर उर्फ बुग्या (वय २२, रा. हॉली फ्लॉवर स्कूलजवळ, लोखंडे मळा, जेलरोड), साहिल राजू मांगकाली उर्फ पोश्या (वय २०, रा. रोकडोबावाडी नाशिकरोड), अनिकेत नितीन गिते उर्फ अंडया (वय २०, रा. शिखरेवाडी, नाशिकरोड) व देविदास तोरवणे (रा. नाराणय बापू नगर, जेलरोड) अशी सराईत संशयितांची (Suspected) नावे आहेत. विशेष म्हणजे मांगकाली उर्फ पोश्या व अनिकेत गिते उर्फ अंड्या हे तडीपार आहेत.
दरम्यान, उपनगर पोलिसांचे रात्रगस्त पथक शनिवारी गस्तीवर असतांना त्यांना नर्मदा दर्शन बिल्डिंगजवळ पाच संशयित संशयास्पद हालचाली करताना दिसले. पोलिसांना पाहताक्षणी संशयितांनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करुन पाटेकर, जाधव, मांगकाली व गिते याला पकडले. तसेच मधुकर तोरवणे हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला. त्यालाही अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली.
चौघांवर ३४ गुन्हे
संशयित मांगकालीवर खून, दरोडा, जबरी लूट, मारहाण, चोरी व तत्सम असे पंधरा गुन्हे नोंद आहेत. तर, जाधव उर्फ डेमू याच्यावर आठ, तसेच वैभव पाटेकर याच्यावर सहा व तोरवणे याच्यावर पाच गुन्हे नोंद आहेत. संशयितांवर जाळपोळ, लूटमार व दहशत माजविण्यासह मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत.




