दहिवड | मनोज वैद्य | Dahiwad
देवळा तालुक्यात (Deola Taluka) मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून, शेतातील पिके वाया गेलीच आहेत. परंतु, त्याचबरोबर शेतीला (Farm) पूरक असलेल्या व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.
तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी प्रकाश कारभारी पानसरे यांच्या निंबोळा रस्त्याला असलेल्या शेत गट नंबर 367/5/अ मधील पोल्ट्री शेडमध्ये रविवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी अचानकपणे शिरल्याने दोन दिवसात लिफ्टिंगला आलेल्या २५० हून अधिक कोंबड्या (Hens) जागेवर मृत्युमुखी पडल्या आहेत. तर उर्वरित कोंबड्यांवरही मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा झाल्याने त्यातील काही गारठून मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सदर आपत्तीमुळे प्रकाश पानसरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढावले असून, सदर घटनेबाबत कंपनी प्रशासनाला कळविण्यात आले आहे त्यानंतर आता कंपनीच्या ध्येय धोरणानुसार योग्य ती कारवाई करण्यात येऊन पानसरे यांना नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. तालुक्यातील शेतकरी आसमानी संकटांना तोंड देत असताना अशी आपत्तीदायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





