नाशिक | Nashik
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी (Nagarparishad Election) आज (दि.२) रोजी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. २६६ नगरसेवकपदांसाठी १,०२८ तसेच ११ नगराध्यक्षपदांसाठी ६१ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.
अकरा नगरपरिषदांसाठी ४१६ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडत असून, जिल्ह्यातील एकूण ३ लाख ७२ हजार ५४३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत बहुतांश ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी राहिली आहे. त्यामुळे दुपारनंतर ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेसाठी ७.३० ते ११.३० या कालावधीत ३२ टक्के मतदान झाले आहे. ओझर १३.९९ टक्के मतदान झाले असून, यामध्ये ३७०७ पुरुष आणि २९३१ महिला अशा ६६३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर नांदगावला सकाळी ९.३० वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान झाले होते. यानंतर आता सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२.६७ टक्के मतदान झाले आहे. येवल्यात सकाळी ११.३० वाजेपर्यंत १०.४६ टक्के आणि सटाणा नगरपरिषदेसाठी २३.६५ टक्के मतदान झाले आहे. याशिवाय पिंपळगाव बसवंतला २३.५९ टक्के, भगूर २०.१२ टक्के, मनमाड १४.२४ टक्के, सिन्नर १८.२६ टक्के, इगतपुरी १९.१५ आणि चांदवड नगरपरिषदेसाठी २१.२९ टक्के मतदान झाले आहे.
उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क
जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर उमेदवारांसह मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले. पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार गोपाल कृष्ण तथा शरद गायकवाड यांनी सहकुटुंब मतदानाचा केले. तर येवला येथे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय आमदार दिलीप बनकर यांनी पिंपळगाव बसवंत येथे मतदान केले. तर येवल्यात राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने सपत्नीक मतदान केले.




