Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Fraud Crime : लष्करातील मित्राने केला विश्वासघात; एसआयपीच्या बहाण्याने बावीस लाखांचा...

Nashik Fraud Crime : लष्करातील मित्राने केला विश्वासघात; एसआयपीच्या बहाण्याने बावीस लाखांचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या एका जवानाला घरच्याच भेदीने अर्थातच लष्करातील (Armay Jawan) एका सहकाऱ्याने लाखो रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये (Nashik) उघडकीस आला आहे. गुंतवणुकीचा (एसआयपी) बहाणा करून कागदपत्रे घेतली आणि या जवानाच्याच नावे २२ लाखांचे कर्ज उचलणाऱ्या संशयित सहकाऱ्याविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी पंकज गुरुनाथ पाटील (रा. बेळगावी) आणि संशयित अमोल रंगनाथ डुकरे (रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) हे दोघेही सैन्य दलात (Army Force) कार्यरत आहेत. लेह येथे कर्तव्यावर असताना दोघांची मैत्री झाली. पुढे दोघांच्या बदल्या वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या, पण संपर्क कायम होता. याच मैत्रीचा फायदा घेत अमोलने पंकज यांना गुंतवणुकीचे आमिष दाखवले. “तुझे डिमॅट खाते उघडून देतो, चांगल्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करू,” असे सांगून अमोलने पंकज यांची गोपनीय कागदपत्रे मिळवली.

जून २०२५ मध्ये त्याने या कागदपत्रांचा (Document) गैरवापर करत पंकज यांच्या नावावर एका नामांकित बँकेतून १५ लाख आणि ७ लाख अशी एकूण २२ लाखांची दोन कर्ज प्रकरणे मंजूर करून घेतली. कर्ज मंजुरीसाठी लागणारे ओटीपीदेखील हातचलाखीने पंकज यांच्याकडूनच मिळवले. विशेष म्हणजे जवानाच्या खात्यात जेव्हा कर्जाचे २० लाख ६८ हजार रुपये जमा झाले, तेव्हा पंकजने अमोलला विचारणा केली. त्यावर “अरे, हे पैसे माझ्या खात्यात यायचे होते, चुकून तुझ्याकडे आले,” अशी बतावणी अमोलने केली. मित्रावर (Friends) विश्वास ठेवून पंकज यांनी १७ लाख रुपये अमोलच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर केले.

पगार कापल्याने फुटले भांडं !

३० जून रोजी पंकज यांच्या पगारातून अचानक ४० हजार ८० रुपयांचा कर्जाचा हप्ता कापला गेला. अमोलने “बँकेची चूक झाली आहे, पुढच्या महिन्यात कापले जाणार नाहीत,” असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय बळावल्याने पंकज यांनी बँकेत चौकशी केली असता, त्यांच्या नावावर २२ लाखांचे कर्ज असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला.; या प्रकरणातील आर्थिक व्यवहार नाशिकमधील शिवाजीनगर आणि त्र्यंबक रोड परिसरातील बँकेतून झाल्याने पंकज पाटील यांनी नाशिकच्या मुंबईनाका पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या