Friday, February 20, 2026
Homeक्राईमNashik Fraud Crime : बनावट 'एम-परिवहन' चे जाळे; नऊ लाखांची फसवणूक

Nashik Fraud Crime : बनावट ‘एम-परिवहन’ चे जाळे; नऊ लाखांची फसवणूक

सहा लाख परत मिळवण्यात शहर सायबरला यश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘इ-चालन थकित असल्याचा मेसेज आणि ‘एम-परिवहन’च्या नावाशी साधर्म्य असलेली एपीके फाईलची (APK File) लिंक त्यावर क्लिक करताच क्रेडिट कार्डवरील तब्बल ९ लाख रुपये क्षणार्धात इतरत्र वर्ग झाले. मात्र, नाशिक शहर सायबर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे या रकमेपैकी ६ लाख रुपये गोठवून तक्रारदाराला परत करण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांच्या (Cyber Crime) नव्या क्लृप्तीचा पर्दाफाश झाला आहे.

- Advertisement -

तक्रारदार लिओनार्ड वेलोझ (रा. पाथर्डी फाटा) यांना १८ ते २७ जानेवारी या कालावधीत सायबर चोरट्यांनी थकित इ-चालान भरण्यासाठी ‘एम-परिवहन’ नाव भासवणारी एपीके फाईल डाउनलोड करण्याची लिंक पाठविली होती. तक्रारदाराने वाहतूक नियमांचे उल्लंघन कधी व कसे झाले, हे जाणून घेण्यासाठी एपीके फाईलच्या बनावट चालानाच्या लिंकवर क्लिक केले. लिंक उघडून फाईल इन्स्टॉल केली. त्यानंतर मोबाईलसह सर्वच अॅपचा अॅक्सेस चोरट्यांनी मिळवित ओटीपी, क्रेडिट कार्डचा तपशील आणि फोनवरील परवानग्या मिळविल्या. तर, क्रेडिट कार्डमधून विविध व्यवहार करून एकूण ९ लाख रुपये वळते केले.

YouTube video player

व्यवहार वेगवेगळ्या ट्रान्झेंक्शन आयडींनी केल्याने सुरुवातीला संशय कमी राहावा, असा डाव रचल्याचे तपासात स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रतीक पाटील व पथकाने संबंधित बँकांशी तातडीने पत्रव्यवहार केला. संशयित खात्यांतील रक्कम गोठवून ‘चेन-फ्रीझ’ प्रक्रियेने ६ लाख रुपये परत मिळवण्यात यश आले. उर्वरित रकमेबाबत तपास सुरू असून संबंधित खात्यांचा माग काढला जात आहे. शहर सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, “लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दोनदा विचार करा,” असा सावधानतेचा इशारा दिला आहे.

फसवणूक कशी होते?

एपीके फाईल ही अँड्रॉइड अॅपची इन्स्टॉलेशन फाईल असते. अधिकृत प्ले स्टोअरऐवजी लिंकवरून डाउनलोड केलेली एपीके अनेकदा ‘मालवेअर’चीच असते. अशी फाईल फोनमध्ये येताच ती एसएमएस, ओटीपींचा परस्पर अॅक्सेस घेते. स्क्रीन -रेकॉर्डिंग/रिमोट अॅक्सेस मिळवून कार्ड, बँकिंग तपशील चोरणारी स्क्रिप्ट चालवते आणि खातेदाराला न कळता आर्थिक व्यवहार पूर्ण करते.

नागरिकांनो, अशी घ्या खबरदारी

  • इ-चालान किंवा सरकारी अॅप फक्त अधिकृत प्ले स्टोअर/अधिकृत संकेतस्थळावरूनच डाउनलोड करावे.
  • एसएमएसमधील संशयास्पद लिंक, शॉर्ट यूआरएल (इ.) टाळाव्या.
  • अज्ञात अॅपला एसएमएस, कॉल, अॅक्सेसिबिलिटी, स्क्रीन-शेअरिंग परवानग्या देऊ नयेत.
  • ओटीपी, कार्ड तपशील कोणालाही सांगू नयेत.
  • बँकेचा अधिकृत हेल्पलाइन क्रमांक स्वतः डायल करावा.
  • शंका आल्यास त्वरित बँकेला कळवून कार्ड ब्लॉक करावे व १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा.

ताज्या बातम्या

Nashik News : रस्ते कामांच्या गोंधळात कामगार ठार; बेफिकिरीचा बळी

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पोलीस आयुक्तालयासमोरच (Police Commissoner Office) सुरू असलेल्या असूचित रस्ते कामांच्या गोंधळात भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू (Death)...