नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पोलीस आयुक्तालयासमोरच (Police Commissoner Office) सुरू असलेल्या असूचित रस्ते कामांच्या गोंधळात भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू (Death) झाला तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. मंगळवारी (दि. १७) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, रस्ते कामांबाबत महापालिका व संबंधित यंत्रणांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
समाधान रवींद्र देवरे (३२, रा. हॉटेल करिलिव्हज्, जेहान सर्कल, गंगापूर रोड; मूळ रा. देऊड, ता. जि. धुळे) असे मृत युवकाचे नाव आहे. तर सुजित दास (२९) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दोघेही जेहान सर्कल येथील हॉटेल करिलिव्हज् येथे कामाला होते. ते गंगापूर रोडने (Gangapur Road) वेगात अशोकस्तंभाकडे निघाले होते. त्याचवेळी येथे एका कामाचे साहित्य व बाजूलाच असलेल्या धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने दुचाकी आयुक्तालयाच्या गेटसमोरील दुभाजकाला धडकली व पुढे विजेच्या खांबावर आदळली.
दरम्यान, समाधानच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो १० ते २० मीटर फरफटत गेला तर त्याची दुचाकी ३० ते ३५ फूट लांब फेकली गेली. गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सरकारवाडा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. आयुक्तालयासमोरच अशी घटना घडल्याने पोलीस व महापालिका प्रशासनाने रस्ते कामांवरील नियंत्रण, देखरेख व जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
खोदकामांमुळे रस्त्यांची अवस्था दयनीय
शहरात एमएनजीएल पाईपलाईन, ऑप्टीकल फायबर, सिंहस्थासाठी सुरू असलेले रस्ते खोदकाम, डांबरीकरण व तोडफोड यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. कोणत्या विभागाने काम सुरू केले, संबंधित ठेकेदार किंवा कंपनीचे नाव काय, कामाचा कालावधी किती, सुरक्षा उपाययोजना कोणत्या याबाबत स्पष्ट व ठळक फलक नसल्याची वस्तुस्थिती आहे. जनहितार्थ सूचना व अधिसूचनेतील अटींचे पालन होत नसल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे. त्यामुळे या अपघातास कारणीभूत कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे.




