नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दहा दिवस पूजन केलेल्या गणरायाच्या विसर्जनाला (Ganesh Visarjan) आज वरूणराजाने हजेरी लावली. त्यामुळे जलधारांच्या वर्षावात गणेशभक्त गणरायाला भावपूर्ण निरोप देत आहेत. सर्वच विसर्जन स्थळांवर पाण्याचे प्रवाह वाढलेले असून, प्रत्यक्षात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे (Rain) धरणातील विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीची पातळी वाढून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने भक्तांना सावधानतेचा इशारा देत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कुंडामध्येच करावे असे आवाहन केले आहे. गोदाघाट परिसरातील नागरिक व व्यावसायिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने (IMD) नाशिक जिल्ह्यास यलो अलर्ट दिल्याने गुरुवार (दि.४ सप्टेंबर) पासून शहरासह ग्रामीण भागात जोरदार सरी कोसळल्या. सलग पावसामुळे गणेशोत्सवातील मिरवणुकीवर व देखाव्यांवर विरजण पडले.
नवव्या दिवशी मोठ्या गर्दीची अपेक्षा होती; मात्र दिवसभर पाऊस सुरू राहिल्याने गणेशभक्तांना (Ganesh Devotes) अडचणींना सामोरे जावे लागले. आज (दि.६) गणेश विसर्जनाच्या दिवशीही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसामुळे मिरवणुकीच्या उत्साहामध्ये काही अंशाने विरजण पडले असले तरी कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे.
गणरायाला भावपूर्ण निरोप
पावसाचा अडथळा असूनही नाशिककरांचा (Nashik People) उत्साह ओसंडून वाहत आहे. विविध सार्वजनिक मंडळे, देखावे, ढोल-ताशा पथकांच्या गजरात व भक्तिरसात नाशिककर आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देतांना बघायला मिळत आहे.
धरणांची स्थिती
जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी धरणसाठे समाधानकारक आहेत. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा असून नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणात ९८.८५ टक्के पाणीसाठा आहे. गौतमी गोदावरी, आळंदी, वाघाड, ओझरखेड, तीसगाव, भावली, वालदेवी, भाम, हरणबारी, केळझर, नागासाक्या व माणिकपुंज ही १२ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.




