नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिका निवडणुकीत (Mahapalika Election) स्पष्ट बहुमत मिळालेले असताना भाजपवर महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना (Corporators) सहलीसाठी घेऊन जाण्याची वेळ आली आहे. उद्या (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता महापालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार आहे.
भाजपकडून महापौरपदासाठी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हिमगौरी आहेर-आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उद्या महापौर आणि उपमहापौरांची निवड (Mayor and Deputy Mayor Election) होणार असल्याने आज (गुरुवारी) भाजपच्या सर्व म्हणजे ७२ नगरसेवकांना पक्ष कार्यालयात बोलावण्यात आले होते. यानंतर सर्व नगरसेवक साहलीसाठी अज्ञात ठिकाणी रवाना झाले. त्यामुळे भाजपकडे (BJP) स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना आपल्याच नगरसेवकांवर भरोसा नाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीनाट्य बघायला मिळाले. इतर पक्षांतील अनेक नेत्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यामुळे निष्ठावंत नाराज झाले आणि त्यांनी निवडणुकीत बंडखोरी केली. तर उमेदवारी वाटपावेळी पक्षाच्या एबी फॉर्मची पळवापळवी झाली. तसेच आपले समर्थक आणि पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी डावलली म्हणून भाजप आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यात नाशिकचे प्रकरण चांगलेच गाजले. तथापि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या संपूर्ण प्रकरणावर दिलगिरी व्यक्त करत यावर पडदा टाकला.
निवडणुकीत (Election) भाजपने स्वबळाचा नारा देत ‘शंभर प्लस’जागा जिंकू असा दावा वेळोवेळी केला होता. पंरतु, त्यांची गाडी ७२ वरच अडकली. त्यामुळे भाजपचे ‘शंभर प्लस’ जागा जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. राज्यात महायुतीमध्ये असलेल्या शिंदे सेनेने नाशिकमध्ये राष्ट्रवादीसोबत युती करत निवडणूक जिंकली. यात शिंदेसेनेला २६ तर राष्ट्रवादीला ४ जागांवर विजय मिळाला. याशिवाय शिवसेना उबाठा १५, काँग्रेस ०३,मनसे १ आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर निवडून आला. त्यानंतर आता महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक जाहीर झाली असून, शिंदे सेनेने उपमहापौर तर शिवसेना उबाठाने महापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पक्षासोबत कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपने आपल्या सर्व ७२ नगरसेवकांना इगतपुरीतील (Igapturi) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेल्याचे बोलले जात आहे. हे सर्व नगरसेवक उद्या (शुक्रवारी) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास महापालिकेत हजर होतील. त्यानंतर ११ वाजता नवीन महापौर आणि उपमहापौराची निवड होईल. आज (गुरुवारी) खुद्द मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नाशिकमध्ये दाखल होत भाजपच्या सर्व नगरसेवकांना सकाळी पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात बोलवले. याठिकाणी सर्व नगरसेवक नाश्ता करून एका दिवसाच्या सहलीसाठी मार्गस्थ झाले.
शिंदे सेना आणि ठाकरे गटाकडून कोणी भरले अर्ज?
महापौरपदासाठी ठाकरे गटाकडून (Shivsena UBT) प्रभाग क्रमांक १५ मधून निवडून आलेल्या सीमा पवार यांनी तर शिंदे सेनेकडून (Shinde Shivsena) उपमहापौरपदासाठी महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, विलास शिंदे आणि राहुल दिवे यांनी अर्ज भरला आहे. भाजपकडे बहुमतापेक्षा १० नगरसेवक अधिक आहेत. त्यामुळे ऐनवेळी कुठलाही राजकीय फटका बसू नये म्हणून सर्व नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे.
शहराध्यक्षांनी आधी राजीनामा दिला अन् नंतर परत घेतला
भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी पक्षांतर्गत कलहामुळे मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर २४ तासांत केदार यांनी यु-टर्न घेत राजीनामा मागे घेतल्याचा खुलासा केला. भाजपकडून महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौरपदासाठी मछिंद्र सानप यांचे नाव निश्चित झाल्याने केदार नाराज होते. त्यांनी पक्षाकडे महापौर आणि उपमहापौरपदासाठी काही नावे पाठवली होती. पंरतु, या दोन्ही पदांसाठी प्रदेश पातळीवरून वेगळीच नावे आल्याने केदार नाराज झाले होते. यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढल्याने त्यांनी राजीनामा मागे घेत असल्याचे सांगितले होते.





