नाशिक | प्रतिनिधी | Nashik
म्हाडाच्या (MHADA Scam) करोडोंच्या जमिनींवर डल्ला मारणाऱ्या भूमाफिया आणि काही अधिकाऱ्यांची साखळी आता उघडी पडू लागली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या विशेष तपास पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन मंडल अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्यानंतर या घोटाळ्यात ‘नवा अँगल’ समोर आला आहे. केवळ कार्यालयातील एसी केबिनमध्ये बसून, २० वर्षांपूर्वीच्या जुन्या नोंदीत कागदपत्रांची शहानिशा न करता परस्पर फेरफार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नगररचना, भूमि अभिलेख आणि विकासकांनी संगनमत करून तयार केलेल्या तब्बल १४ बनावट नकाशांच्या आधारे हे फेरफार करण्यात आले. संशयित (Suspected) मंडल अधिकारी दिलीप वामन आणि श्याम बोरसे यांनी कोणतीही खातरजमा न करता आणि जुन्या सातबारा नोंदी न तपासता फेरफार मंजूर केले. या घोटाळ्याचे पुरावे एसआयटीने न्यायालयात सादर केले असून, दोन्ही संशयित सध्या पोलिस कोठडीत (Police Custody) आहेत. तपासादरम्यान समोर आलेली सर्वात गंभीर बाब म्हणजे, संबंधित संशयित शासकीय अधिकाऱ्यांनी चक्क आपल्या कार्यालयात बसूनच बनावट नकाशे तयार केले.
त्यावर खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट (Fake) शिक्के मारून मूळ आरक्षणालाच हरताळ फासला. शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून म्हाडाच्या जमिनीचा ताबा खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा कट आखला होता, असे तपासात समाेर आले आहे. या प्रकरणात दाखल दोषारोप पत्रात (चार्जशीट) केवळ अधिकाऱ्यांचीच नव्हे, तर नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक, माजी नगरसेवक आणि बड्या राजकीय पुढाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत.
अटकपूर्व घेणाऱ्यांची अडचणी वाढणार!
यापूर्वी अटक (Arrested) झालेले नायब तहसीलदार संशयित नितीन पाटील, नगररचना सहाय्यक संचालक कल्पेश पाटील, उपअधीक्षक बिपीन काजळे, भूमापन परिक्षक श्रीकांत परदेशी या पाच शासकीय अधिकारी व काही बिल्डर सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाला भक्कम पुरावे हाती लागले आहेत. टप्प्याटप्प्याने पुरवणी दोषारोप पत्र दाखल होणार असल्याने, ज्या संशयितांनी अटकपूर्व जामीन मिळवला, त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे.
घोटाळ्याचा घटनाक्रम
- मार्चपासून ‘एसआयटी’कडून विशेष तपास सुरू.
- ५ उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांसह विकासकांना पूर्वश्रमीची अटक.
- १४ बनावट नकाशांच्या आधारे २० वर्षांपूर्वीच्या नोंदींत फेरफार.
- मंडल अधिकारी वामन व बोरसे सध्या पोलिस कोठडीत.




