नाशिक | Nashik
महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation Election) आज (दि.१५) रोजी सकाळी साडे सात वाजेपासून विविध केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला प्रभाग क्रमांक २४ आणि २९ मध्ये ईव्हिएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जवळपास पाउण तास उशिराने मतदानास सुरुवात झाली. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी नऊ वाजेपर्यंत नाशिकमध्ये ६.५१ टक्के इतके मतदान झाले आहे.
नाशिक महापालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी ७३५ उमेदवार (Candidate) रिंगणात असून, त्यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे व २०८ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती होणार आहेत.या निवडणुकीत एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ६ लाख ५६ हजार ६७५ महिला आणि ७ लाख ३ हजार ९६८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर तृतीयपंथी ७९ मतदार आहेत.
प्रभाग क्रमांक ०२, २४ आणि २९ मध्ये EVM मध्ये बिघाड
प्रभाग क्रमांक ०२ मधील आडगावच्या महापालिका शाळेतील खोली क्रमांक ९ मधील ईव्हीएम नऊ वाजेपर्यंत बंद होते. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन बदलल्याने मतदानास सुरुवात झाली. तर प्रभाग क्रमांक २४ मधील मॉडर्न हायस्कूल, खोली क्रमांक ८ येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने या मतदान केंद्रावर सकाळी बराच वेळ मतदान सुरू होऊ शकले नाही. तांत्रिक अडचण आल्यामुळे मतदान प्रक्रियेला उशीर झाला. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून केल्याने संबंधित मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. तसेच प्रभाग क्रमांक २९ मधील एका मतदान केंद्रातील खोली क्रमांक दोनमध्ये ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले. त्यामुळे तब्बल अर्धा तास मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. यानंतर मशीन सुरू झाल्याने मतदान प्रक्रिया सुरु झाली.




