Monday, September 21, 2026
HomeनाशिकNashik MVP Annual Meeting : विद्यापीठाचा प्रस्ताव नामंजूर; दहा वर्षे सेवा पूर्ण...

Nashik MVP Annual Meeting : विद्यापीठाचा प्रस्ताव नामंजूर; दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सेवकांना सातवा वेतन आयोग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

​मराठा विद्या प्रसारक समाजाचे (Maratha Vidya Prasarak Samaj) स्वायत्त विद्यापीठ स्थापन करण्याचा गेल्या वर्षापासून चर्चेत असलेला प्रस्ताव अखेर वार्षिक सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आला. संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेत सेवकांना १ जानेवारी २०२७पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केली. मविप्रची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अध्यक्ष डॉ. ढिकले यांनी संस्थेच्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यानंतर सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे (Nitin Thackeray) यांनी सुमारे सव्वा तास संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आणि प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला.

- Advertisement -

संस्थेची आर्थिक स्थिती, विविध उपक्रम, रुग्णालयातील (Hospital) रुग्णसंख्या तसेच ठेवी यासह विविध बाबींची आकडेवारी त्यांनी मांडली. याच वेळी दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याच्या वेळी मविप्रच्या स्वायत्त विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव चर्चेला आला. प्रस्तावामध्ये स्थगिती असा उल्लेख असल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर या विषयावर चर्चा होऊन अखेर विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. त्यामुळे मागील वार्षिक सभेपासून चर्चेत असलेल्या या प्रस्तावाला तूर्त पूर्णविराम मिळाला. प्रणव पवार यांनी होरायझन स्कुलचा वरचा वाढीव मजला अनधिकृत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरुन ठाकरे यांनी तो अनधिकृत असेल तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे, असे म्हणत पवार यांचे आरोप खोडून काढले.

उदाजी मराठा कॅम्पसमधील दोन एकर जागा महापालिकेच्या (NMC) अग्निशमन दलासाठी देण्याच्या मुद्यावरही चर्चा झाली. यावेळी सरचिटणीस ठाकरे यांनी हा विषय सभासदांच्या निर्णयावर सोपविण्याची भूमिका मांडली. अध्यक्ष डॉ. ढिकले यांनी याबाबत तज्ज्ञ समिती स्थापन करून तिच्या अहवालानुसार आणि सभासदांच्या मतानुसार निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. डी. पी. जाधव यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. त्यानंतर प्रणव पवार, अमृता पवार, बाळासाहेब कोल्हे, सचिन पिंगळे, प्रमोद पवार, प्रवीण जाधव, मोहन पिंगळे, रमेश पिंगळे, अनिल पवार आदी सभासदांनी विविध विषयांवर चर्चा केली.

ॲड ठाकरे यांचे आजचे मॅरेथॉन प्रास्ताविक चांगलेच रंगले. त्यानी दृकश्राव्य माध्यमाचा चांगला वापर केला. त्यानंतर संस्थेच्या प्रगतीसाठी सरकारी पातळीवर सरू असलेल्या विविध प्रयत्नाची माहिती देतना त्यांनी लावरे तो व्हीडीओ म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यानी कशी अश्वासने दिली हे दाखवीले. वैद्यकीय महविद्यालयाची जागा भाडे एक रुपये भाडे तत्त्वावरच मिळविण्यासाठी फडणवीस यांनी दिलेले अश्वासन त्यानंतर पवित्र पोटर्लद्वारे भरती करतांना संस्थेतील कार्यरत सेवकासाठी वेगळा निर्णय याबाबत दिलेले अश्वासन त्यांनी दाखविले.

हा आमचाच विजय

विद्यापीठाचा प्रस्ताव नामंजूर झाल्याचे जाहीर होताच विरोधकांनी हा आपला विजय असल्याचा दावा केला. मात्र, सत्ताधारी गटाने विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावासाठी आपला आग्रह नव्हताच, अशी भूमिका मांडत विरोधकांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले.

पवार उभ्या राहताच गोंधळ

सभेची सुरुवात शांततेत झाली असली, तरी माजी सरचिटणीस नीलिमा पवार बोलण्यासाठी उभ्या राहताच त्यांचा माईक बंद झाल्याने सभागृहातील वातावरण बदलले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. या प्रसंगामुळे सभेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले.

अखेर सभा शांततेतच

मविप्रच्या आगामी निवडणुकीच्या आधीची शेवटची सभा असल्याने ही सभा वादळी ठरण्याची चर्चा केवळ चर्चाच ठरली. कारण वार्षिक सभेमध्ये सभासदांनी शांततेत कामकाज सुरू ठेवण्याला दिलेले प्राधान्य आणि अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी वारंवार आपल्याला सभा शांततेत पार पडायची आहे असा दिलेला संदेश हेच या सभेचे ठळक वैशिष्ट्य ठरले. अखेरीस गोंधळाचा आवाज मागे पडला आणि संस्थेच्या विकासाचा आवाज सभागृहात अधिक प्रभावी ठरला.. हेच सभासदांनी समजूतदारपणे या सभेच्या निमित्ताने दाखवून दिले.

ताज्या बातम्या

Nashik Simhastha News : सिंहस्थ ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा आयुक्त शेखर...

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbhmela) ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी...