Monday, November 23, 2026
HomeनाशिकNashik News : पुरुष नसबंदीत आदिवासी तालुक्यांची आघाडी; शहरी सुशिक्षित पुरुषांची पाठ,...

Nashik News : पुरुष नसबंदीत आदिवासी तालुक्यांची आघाडी; शहरी सुशिक्षित पुरुषांची पाठ, जिल्ह्यात १३,५८१ नसबंदी शस्त्रक्रिया

१३,११५ महिला, तर केवळ ४६६ पुरुषांचा सहभाग

नाशिक | विजय गिते | Nashik

‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ हा संदेश समाजाने स्वीकारला असला, तरी कुटुंब (Family) नियोजनाची जबाबदारी मात्र आजही महिलांच्याच माथी मारली जात असल्याचे धक्कादायक वास्तव जिल्ह्यातील आकडेवारीतून समोर आले आहे. पुरुषप्रधान मानसिकतेमुळे पुरुष नसबंदीकडे पाठ फिरवत असताना आदिवासीबहुल पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील पुरुषांनी मात्र या सामाजिक समजुतींना छेद दिला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात झालेल्या एकूण १३ हजार ५८१ नसबंदी शस्त्रक्रियांपैकी तब्बल १३ हजार ११५ शस्त्रक्रिया महिलांनी, तर अवघ्या ४६६ शस्त्रक्रिया पुरुषांनी केल्या आहेत.

- Advertisement -

विशेष म्हणजे पुरुष नसबंदीच्या (Male Sterilisation) आकडेवारीत पेठ आणि सुरगाणा तालुक्यांनी आघाडी घेत शहरी सुशिक्षित समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध कुटुंब नियोजन कार्यक्रम राबविले जातात. मात्र, या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत महिलांचाच सहभाग अधिक असल्याचे मागील पाच वर्षांच्या आकडेवारी पाहता सातत्याने दिसून येते. जिल्ह्यातील आकडेवारीनुसार, एकूण नसबंदी शस्त्रक्रियांमध्ये पुरुषांचा वाटा केवळ ३.४ टक्के, तर महिलांचा वाटा तब्बल ९६.६ टक्के आहे. म्हणजेच कुटुंब नियोजनाचा जवळपास संपूर्ण भार महिलांनाच पेलावा लागत आहे.

जिल्ह्यातील पुरुष नसबंदीच्या आकडेवारीत आदिवासीबहुल पेठ तालुका २३३ शस्त्रक्रियांसह प्रथम क्रमांकावर असून सुरगाणा तालुक्यात २२२ पुरुषांनी नसबंदी केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातही (Trimbakeshwar Taluka) ४३ पुरुषांनी पुढाकार घेतला आहे. याउलट बागलाण, देवळा, इगतपुरी, नांदगाव, सिन्नर आणि येवला या सहा तालुक्यांमध्ये एकाही पुरुषाने नसबंदी केलेली नाही. चांदवड, कळवण आणि मालेगावमध्ये प्रत्येकी एक, निफाडमध्ये दोन, दिंडोरीमध्ये आठ, तर नाशिक तालुक्यात अवघ्या नऊ पुरुषांनी नसबंदी केली आहे.

विशेष म्हणजे पेठ आणि सुरगाणा या आदिवासीबहुल तालुक्यांतील पुरुषांचा सहभाग जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत लक्षणीय आहे. त्यामुळे कुटुंब नियोजनाबाबत आदिवासी समाजातील पुरुषांनी घेतलेला पुढाकार हा शहरी भागातील पुरुषांसाठी निश्चितच विचार करायला लावणारा ठरत आहे. पुरुष नसबंदीबाबत समाजात आजही अनेक गैरसमज आहेत. नसबंदी केल्यास शारीरिक ताकद कमी होते, पुरुषार्थावर परिणाम होतो किंवा वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात, अशा भीतीपोटी अनेक पुरुष या शस्त्रक्रियेपासून दूर राहतात. प्रत्यक्षात आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुरुष नसबंदीची प्रक्रिया अधिक सोपी, सुरक्षित आणि कमी वेळेत पूर्ण होणारी झाली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष नसबंदीची शस्त्रक्रिया कमी गुंतागुंतीची असतानाही पुरुषांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

कुटुंब नियोजन हा पती-पत्नी दोघांचाही समान सहभाग असलेला निर्णय आहे. मात्र, पारंपरिक पुरुषप्रधान मानसिकतेमुळे महिलांनाच शस्त्रक्रियेची जबाबदारी स्वीकारावी लागते. महिलांना शस्त्रक्रियेनंतर विश्रांती आणि वैद्यकीय देखभालीची अधिक गरज भासू शकते. त्यामुळे पुरुषांनीही कुटुंब नियोजनात सक्रिय सहभाग घेण्याची गरज आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यासाठी २०२५-२६ या वर्षात पुरुष व महिला मिळून एकूण २१ हजार ६३० नसबंदी शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी १३ हजार ५८१ शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याने उद्दिष्टाच्या ६३ टक्के पूर्तता झाली आहे. २०२६-२७ या वर्षासाठीही २१ हजार ६३० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत ५ हजार ७३१ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

पुरुष नसबंदी कमी होण्यामागे पुरुषी मानसिकता आणि गैरसमज कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले. कुटुंब नियोजन ही केवळ महिलांची जबाबदारी नसून पुरुषांनीही त्यात समान सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.

डॉ. राजेंद्र बागुल, जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद

ताज्या बातम्या