Monday, November 23, 2026
Homeक्राईमShrirampur : ‘ग्रो इन्व्हेस्टर’ फसवणूक प्रकरणातील आरोपी फरार माहिती देणार्‍यास पोलिसांकडून 25...

Shrirampur : ‘ग्रो इन्व्हेस्टर’ फसवणूक प्रकरणातील आरोपी फरार माहिती देणार्‍यास पोलिसांकडून 25 हजारांचे बक्षीस जाहीर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणार्‍या ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीच्या प्रकरणात अहिल्यानगर पोलीस दलाने पावले उचलली आहेत. गुन्ह्यातील फरार आरोपींची ठोस आणि खात्रीशीर माहिती देणार्‍या नागरिकाला पोलीस प्रशासनाकडून 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisement -

सर्वप्रथम सर्वसामान्य गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणार्‍या ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीचा कारनामा सर्वप्रथम दैनिक सार्वमतने पुढे आणला होता. याची दखल पोलिसांनी घेत तपास चक्रे फिरविली. यात तालुक्यातील भोकर शिवारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक होत असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. तसेच अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून रक्कम स्वीकारली जात असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका व शहर पोलीस ठाण्यांच्या पथकाने 26 डिसेंबर 2025 रोजी संबंधित ठिकाणी छापा टाकला.

झडतीदरम्यान घटनास्थळावरून विविध बँकांची पासबुके, चेकबुके, हिशोबाच्या नोंदी, लॅपटॉप, कॉम्प्युटर स्क्रीन, पेन ड्राईव्ह, कॅश काउंटिंग मशीन, दोन तिजोर्‍या, वॉकीटॉकी, एचएचएमडी. आणि 1 लाख 4 हजार 600 रुपये रोख असा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्वतः फिर्यादी होऊन श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 (4) व 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा नोंद होताच कारवाईच्या भीतीने काही गुंतवणूकदारांना रक्कम परत करण्यात आली; मात्र अद्याप अनेक ठेवीदारांचे पैसे परत करणे बाकी असून आरोपी फरार आहेत. अमोघ संदिप कपाटे, संदिप मोहिनीराज कपाटे ( दोघ रा. हनुमानवाडी, भोकर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे पसार आरोपींची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी तपासाच्या दृष्टीने या दोघांबाबत माहिती देणार्‍यासाठी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणार्‍याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. फरार आरोपींना कोणताही आश्रय देऊ नये किंवा पळून जाण्यास मदत करू नये. या कंपनीकडून किंवा आरोपींकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. कमी वेळेत दुप्पट-तिप्पट परतावा देणार्‍या संशयास्पद योजनांमध्ये पैसे गुंतवून कोणीही आमिषाला बळी पडू नये. तसेच आरोपींबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती असल्यास नागरिकांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सतिश डौले, सहायक पोलीस निरिक्षक चारुदत्त खोडे, सहायक पोलीस निरिक्षक रोशन निकम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारच्या आदेशानंतरही बँका व फायनान्स कंपन्यांकडून शेतकर्‍यांना वसुलीसाठी त्रास

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar केंद्र सरकारकडे राज्य सरकारने दुष्काळी मदतीची मागणी करूनही अद्याप मदत मिळालेली नाही. केंद्राकडून मदत मिळण्यास विलंब का होत आहे? राज्य सरकारचे केंद्रात...