Monday, November 23, 2026
HomeनगरAhilyanagar : सरकारच्या आदेशानंतरही बँका व फायनान्स कंपन्यांकडून शेतकर्‍यांना वसुलीसाठी त्रास

Ahilyanagar : सरकारच्या आदेशानंतरही बँका व फायनान्स कंपन्यांकडून शेतकर्‍यांना वसुलीसाठी त्रास

केंद्र सरकारकडून दुष्काळ मदतीसाठी विलंब होत असल्याचा आ. शशिकांत शिंदेंचा यांचा आरोप

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

केंद्र सरकारकडे राज्य सरकारने दुष्काळी मदतीची मागणी करूनही अद्याप मदत मिळालेली नाही. केंद्राकडून मदत मिळण्यास विलंब का होत आहे? राज्य सरकारचे केंद्रात वजन आहे की नाही, अशी शंका निर्माण होत असल्याचा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. दरम्यान, मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी आदेश देऊनही बँका व फायनान्स कंपन्यांकडून शेतकर्‍यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिला जात असल्यास अशा संस्थांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

शिंदे यांनी अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर-बहीरवाडी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी खासदार नीलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. दुष्काळामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असताना केंद्राकडून मदत मिळण्यास विलंब होत असल्याबद्दल आ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या कर्जवसुलीबाबत आदेश दिलेले असतानाही बँका आणि फायनान्स कंपन्या कर्जाच्या वसुलीसाठी शेतकर्‍यांना त्रास देत आहेत. काही ठिकाणी जप्तीची कारवाईही केली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. सामान्य जनतेला त्रास देणार्‍या बँका आणि फायनान्स कंपन्यांना त्याच पध्दतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

खासदारांच्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर खा. संजय राऊत यांनी प्रत्येक खासदाराला 150 कोटी रूपये दिले जात असल्याचा आरोप केला होता. याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, पैसे कोणी दिले आणि कोणाकडे दिले, हे संजय राऊत यांनाच विचारा. महाराष्ट्रात संशय निर्माण होईल, असे वातावरण असू नये. मात्र, याबाबत आमच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. आमचे खासदार भक्कमपणे उभे असून महाराष्ट्राचे चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. आ. रोहित पवार नाराज असून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांबाबतही शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. रोहित पवार पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहत असतात. पक्षाच्या चौकटीत राहून चर्चा करून निर्णय घेतले जातात.

अजितदादांच्या संदर्भातील पत्रकार परिषदेत त्यांनी काही वैयक्तिक निर्णय घेतले म्हणून ते नाराज आहेत, असे अजिबात नाही, असे शिंदे यांनी सांगितले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. अजितदादा हे जनतेसाठी आयुष्यभर भरपूर काम करणारे व्यक्तिमत्त्व होते. एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर तिच्या कामाचे राजकीय भांडवल करणे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

कुंभमेळ्यासाठी धरणे रिकामी करणार ?
नाशिकमध्ये होणार्‍या कुंभमेळ्यासाठी तब्बल 36 हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असल्याची माहिती आपल्याकडे आहे. त्यासाठी दोन ते तीन धरणांमधून पाणी उपलब्ध करून देण्याची चर्चा आहे. एकीकडे दुष्काळी भागात शेती आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसताना कुंभमेळ्यासाठी पाण्याचे नियोजन कसे करणार, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

पाच हजारांच्या मदतीवर कुटुंब कसे चालणार ?
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य सरकारला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करत शशिकांत शिंदे यांनी शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कर्जमाफी केली तरी पुढील वर्षी उत्पन्न मिळेलच, याची खात्री नाही. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाला पाच हजार रुपयांची मदत कशी पुरणार? केंद्र सरकारने अद्याप महाराष्ट्राला मदत दिलेली नाही. केंद्रीय पथक येऊन गेले, तरी मदत मिळालेली नाही. राज्यकर्त्यांचे दिल्लीत वजन कमी पडते की काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती, अन्नधान्याचे उत्पादन आणि भविष्यातील पाणीटंचाई यांचा ग्राउंड रिपोर्ट तयार करून सरकारने त्यानुसार नियोजन करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

सरकारचे आर्थिक नियोजन कोलमडले
राज्य सरकारच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना शिंदे यांनी सरकारकडे निधीची कमतरता असल्याचा आरोप केला. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना अग्रीम मदत देण्यात अडचणी येत आहेत. कर्जमाफीची रक्कमही टप्प्याटप्प्याने दिली जात आहे. सरकारकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे याद्या तयार करून मदतीचे वितरण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. सरकारने इतर खात्यांमधील निधी वळवण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी म्हटले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ तात्पुरती मदत न देता आगामी वर्षातील शेती उत्पादन, पाणी आणि अन्नधान्याच्या उपलब्धतेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Crime Diary : पाच हजारांच्या आमिषापायी बँक खाते सायबर गुन्हेगारांच्या हवाली!

0
अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून लुटलेली कोट्यवधी रूपयांची रक्कम फिरविण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील काही बँक खात्यांचा वापर...