नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात घरगुती हिंसाचाराचे प्रकार घडत असतानाच दुसरीकडे गेल्या दहा महिन्यांत अल्पवयीन (Minor) मुला-मुलींच्या अपहरणाचे तब्बल २८१ गुन्हे नोंद झाले आहेत. तर विनयभंगाचे (Molestation) २०९ गुन्हे दाखल करून अनेक संशयितांना अटक (Arrested) केली आहे. यात लैंगिक अत्याचाराचे ९५ गुन्हे दाखल असून बहुतांश प्रकरणात जुने प्रेमसंबंध व विवाहबाह्य संबंध समोर आले आहेत.
शहरात सार्वजनिक ठिकाणी महिलांवरील छेडछाडीच्या प्रकरणात वाढ झाल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गतवर्षी शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये विनयभंग केल्याप्रकरणी १६५ गुन्हे दाखल होते. त्यानुसार मागील वर्षी दर महिन्याला सरासरी १३ ते १४ गुन्हे दाखल झाले. मात्र यावर्षीं १ जानेवारी ते २६ नोव्हेंबर या कालावधीत २३० गुन्हे दाखल झाले असून दरमहा सरासरी १९ ते २० गुन्हे दाखल असल्याचे वास्तव आहे. गुन्ह्यांमधील संशयितांची ओळख पटली असून काही संशयित परजिल्हा व परराज्यातील असून बहुतांश संशयित तुरुंगात आहेत.
पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये महिलावर्गास त्रास देणारे बहुतांश हे ओळखीतील, नातेसंबंधातील, घराजवळ राहणारे किंवा मित्र परिवारातील संशयित आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई पोलिसांनी केली आहे. मात्र छेडछाड करणाऱ्यांना होणाऱ्या शिक्षेचे प्रमाण अत्यल्प असून प्रेमसंबंध, ओळख, मोबाईलवरील चॅटिंग, ओळखीतून काढलेले फोटोग्राफ्स, त्यानंतर संबंधात आलेले वितुष्ट व अन्य काही कारणातून हे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे. शहरातील शैक्षणिक संस्था, बाजारपेठा, जॉगिंग ट्रॅक, रहिवासी परिसरात दामिनी पथकांसह स्थानिक पोलिसांची गस्त असते. तरीदेखील पोलीस नसल्यास किंवा ते गेल्यानंतर परिसरातील टवाळखोर सक्रिय होतात.
संशयितांची हिंमत
आर्टिलरी रोडवरील एका दुकानात रविवारी (दि.२४) रात्री आठ वाजता दाम्पत्यासह एक मुलगी साहित्य खरेदी करत होती. त्यावेळी एका संशयित युवकाने मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तसेच तिच्या हातात चिड्डी दिली. त्यामुळे मुलीने चिठ्ठी आईला दिल्यानंतर त्या मुलाने महिलेच्या हातातील चिठ्ठी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या घटनेत मुलीची आई, वडील, आजी सोबत असतानाही संशयिताने विनयभंग केल्याचे समोर आले.
काही विकृत, काही मनोरुग्ण?
शहरातील गर्दीत तरुणी, महिलांची छेडछाड होत आहे. त्यात ओळखीच्या व्यक्तींकडून सर्वाधिक छळ होत असून ते काही विकृत थेट तरुणी व महिलांना स्पर्श करून विनयभंग करत आहेत, असे तपासात समोर आले आहे. यावर्षी ११ महिन्यांत विनयभंगाचे २३० गुन्हे दाखल झाले आहेत. तर मागील वर्षभरात १६५ गुन्हे दाखल होते. त्यामुळे विनयभंगाच्या प्रकारात वाढ झाली आहे. तसेच अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीच्या प्रकारातही वाढ झाल्याचे चित्र आहे. या प्रकरणांत पोक्सो कायद्यान्वये गुन्हे नोंद केले जात आहेत.