नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Nashik APMC) माजी सभापती संशयित शिवाजी चुंबळे (Shivaji Chumbhale) यांच्यासह इतर १० जणांविरोधात वाडीव-हे पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अर्थात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून विशेष म्हणजे जुलै २०२४ मध्ये ही घटना घडली असून ९ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला असून मंजूर घरकुलाची पायाभरणी करताना चुंबळे व साथीदार आल्यावर त्यांनी गोंधळ घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) सारूळ (Sarul) येथील भाऊसाहेब आबा तांबडे (४४) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सारूळ शिवारातील गट नंबर १८० मधील त्यांच्या सामाईक जागेतील शेतजमिनीत तांबडे यांचे घरकाम सुरू असताना शिवाजी चुंबळे सहकाऱ्यांसह आले. त्यांनी फिर्यादी तांबडे यांना ‘ही जागा तुमची बहीण लीलाबाई बेंडकुळी यांच्याकडून खरेदी केली असून साठेखतही केले आहे, त्यामुळे काम थांबवा’, असे सांगितले. तेव्हा तांबडे यांनी ‘जागा जर तुमची असेल तर कागदपत्रे दाखवा,’ अशी मागणी केली.
तेव्हा चुंबळे यांच्यासोबत असलेल्या संशयिताने (Suspected) दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शिवाजी चुंबळे, गणेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर चौधरी, रतन नवले यांच्यासह आठ ते दहा जणांवर विविध कलमांसह ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर (Harish Khedkar) करत आहेत.
संबंधितांशी मागील दीड वर्षांपूर्वी व्यवहार झाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी त्याबाबत वादावादी झाल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आला. तो राग मनात धरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी चुंबळे. माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक




