नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर (Nashik and Trimbakeshwar) येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थाचे नियोजन आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी व समन्वयपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने (State Goverment) अखेर स्वतंत्र ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ प्राधिकरण’ स्थापन केले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सिंहस्थ आढावा बैठकीत प्राधिकरणाचा अध्यादेश लवकरच जारी केला जाईल, असे सांगण्यात आले होते. राज्यपालांनी सोमवारी सिंहस्थ प्राधिकरणाच्या अध्यादेशावर स्वाक्षरी करून अंतिम मान्यता दिली. सध्या नाशिकसाठी नाशिक महापालिका आणि त्र्यंबकेश्वरसाठी जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत यंत्रणा कार्यरत आहे. परंतु आता प्राधिकरण झाल्याने कुंभमेळ्याचे नियोजन एकाच छताखाली प्राधिकरणामुळे होणार आहे. प्राधिकरणामुळे आता विविध विकासकामांसाठी निधीचे नियोजन गतीने होऊन विकासकामांना गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणावर नाशिकचे विभागीय आयुक्त पदसिध्द अध्यक्ष राहणार आहेत. जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस महानिरीक्षक हे उपाध्यक्ष असणार आहेत. प्राधिकरणात २२ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात विभागीय आयुक्त (अध्यक्ष), नाशिक जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक (उपाध्यक्ष), अहिल्यानगर जिल्हाधिकारी, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आयुक्त, (पदसिध्द सदस्य) तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, नाशिक महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी त्र्यंबकेश्वर नगर परिषद, नियोजन उपायुक्त, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ विभागीय नियंत्रक, आरोग्य उपसंचालक, अधीक्षक अभियंता जलसंपदा, गोदावरी नदी व जलव्यवस्थापन प्रभारी, बांधकाम विभाग मुख्य अभियंता, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अधीक्षक अभियंता महावितरण, महाराष्ट्र प्रक्षण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी, लेखा व कोषागारे सहसंचालक, रेल्वे मंडळाचे प्रतिनिधी, कुंभमेळा आयुक्त (सचिव) राहणार आहेत.
दरम्यान, प्रत्यक्षात प्राधिकरणाच्या आखाडयाच्या सिहंस्थ चर्चेवेळीच प्रतिनिधींचा सामावेश प्राधिकरणावर असावा, अशी मागणी विविध आकाड्यांच्या प्रमुख संत-महंतांनी सातत्याने लावून धरली होती. मात्र प्राधिकरणाच्या मसुद्यात अधिकाऱ्यां व्यतिरिक्त इतर कोणाचाही सहभाग नसल्याचे दिसून येत आहे.
प्राधिकरणाचे अधिकार व कार्य
सिंहस्थ व्यवस्थापन आराखडा तयार करणे. प्रस्तावित बांधकामांना प्रशासकीय मान्यता देणे. निविदा प्रक्रिया राबवणे. कंत्राटदार नियुक्त करणे. कंत्राटांच्या दायित्वांचे संनियंत्रण करणे. सिंहस्थासाठी बांधलेल्या मालमत्तांच्या पुढील वापराबाबत निर्णय घेणे. प्राधिकरणाचा अहवाल दरमहा मंत्री समितीसमोर व शासनाला सादर करणे.
संत-महंत समाधानी
नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील सिंहस्थ प्राधिकरणाची रचना ही प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या धर्तीवर करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक संत-महंतांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्राधिकरणाच्या स्थापनेमुळे विभागांच्या समन्वय गडवणे गतिमान होणार आहे. त्या माध्यमातून विकासकामांना गती देणे शक्य होणार आहे.
डॉ. प्रवीण गेडाम, अध्यक्ष, नाशिक-त्र्यंबकेश्वर




