Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याबैला, खरा तुझा सन.. शेतकर्‍या तुझं रीन

बैला, खरा तुझा सन.. शेतकर्‍या तुझं रीन

नाशिक । प्रतिनिधी

आज बैलपोळा! ज्यांच्याकडे बैलजोडी आहे त्यांच्या घरी याची तयारी कालपासूनच सुरु झाली होती. बैलाला सजवण्यासाठीच्या साहित्याचा बाजार कालच झाला होता. काळ कठीण असला तरी वर्षभर कष्ट उपसणार्‍या बैलांचा सण साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे ऋण चुकवण्यासाठी पोळ्याची तयारी होणार नाही, पोळ्याचा सण साजरा होणार नाही, असे घर सापडणे शक्य तरी आहे का? या सणाची तयारी कशी होते याचे वर्णन बहिणाबाई चौधरी यांनी खूप सुंदर केले आहेत –

- Advertisement -

त्या म्हणतात,

आला आला शेतकर्‍यापोयाचा रे सन मोठा

हाती घेईसन वाट्या,

आता शेंदूराले घोटा

लावा शेंदूर शिंगाले,

गयामंदी बांधा जीला…

अशी तयारी घरोघरी झाली असेलच. सायंकाळी गावाच्या मंदिरात पोळा फुटेल. देवदर्शन होईल आणि मग बैलांची मिरवणूक निघेल.

आजचा दिवस बैलांचा. त्यांच्या हक्काच्या विश्रांतीचा. गोडधोड खाण्याचा. उद्यापासून कवी यशवन्त म्हणतात, –

सण एक दिन,

बाकी वर्षभर ओझे ओढायचे..

तसे प्रत्येकाचा नेहेमीचाच दिवस सुरु होणार आहे.

बैलपोळ्याचे अनेक कवींनी आणि साहित्यिकांनी खुप सुंदर वर्णन केले आहे. पण वास्तव तसे आहे का? दिवसेंदिवस बैलांचीसंख्या कमी होत आहे. बैलांचा आनंदाने सांभाळ करायची कितीही इच्छा असली तरी बैल सांभाळणे आणि त्यांची देखभाल करणे सर्वच शेतकर्‍यांना शक्य होत नाही. बैल करतात ती असंख्य कामे यंत्र करत आहेत.

आर्थिकदृष्ट्या देखभाल परवडत नाही. बैलांचे काम करणारीसालदार परंपरा कमी होत आहे. बैलांनी करावीत अशा कामांची संख्या दिवसेंदिवस कमीच होत आहे. अशा अनेक कारणांमूळे बैलांची संख्या कमी होत आहे ही वस्तुस्थिती आहे.

नाग्या गेला तेव्हा सगळे घर रडले होते..

आमच्याकडे सुरुवातीच्या काळात म्हणजे मी दहावीला होतो तेव्हा नाग्या नावाचा बैल होता. मोठा गुणी आणि गरीब होता. बैल सहसा कोणाला बसू देत नाही. पण आम्ही बसायचो. त्याच्या शिंगांशी मस्ती करायचो. मग आम्हीही थोडीशी वैरण जास्तच टाकायचो. तो म्हातारा झाला आणि एक दिवस वारला. आम्ही मोठा खड्डा खणला. त्याचा रीतसर अंत्यविधी केला. त्यावर एक दगड ठेवला. त्याला शेंदूर लावला. समाधी बांधली. घरातील एखादा माणूस गेल्याचे दुःख आम्हाला आणि आजूबाजूच्या सर्वानाच झाले होते.

तुकाराम बोराडे, कृषीभूषण

बैलभाड्याने घेतले जातात..

बैल सांभाळायची आवड असावी लागते. काही छोटे शेतकरी बैलजोडी सांभाळतात. मग ज्यांना शेतीकामासाठी बैलांची गरज पडते ते अशा शेतकर्‍यांकडून बैल भाड्याने घेतात. त्यांचा दर 1000 ते 1500 च्या दरम्यान असतो. अनेक गावांमध्ये अशा 3-4, 3-4 जोड्या असतात. बैल बसून पोसले जातात! बैलांना नियमित काम असले पाहिजे. आठवड्यातून त्याने 4-5 दिवस तरी काम केले पाहिजे. तसे काम आता राहिले नाही.

बरेसचेयांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळे बैल बसून पोसले जातात. मग शिंगाने माती उकरतात. एखादा बैल मारका असेल तर तो जवळ कोणी आले की लाथ मारतो. बैल आपसात मारामारी करतात. कामामध्ये असले की बैल देखील काम करून थकून जातो. असले उद्योग करत नाही. पण आता कामच नाही. त्यामुळे बैल थकत नाही. बैलांना पुरेसे काम देऊ शकत नाही यामुळे देखील बैलांची संख्या कमी होत आहे.

बैलजोडीचा खर्च परवडत नाही!

एक बैलजोडी सामान्य शेतकर्‍याने सांभाळायची ठरवली तरी परवडत नाही. एका बैलजोडीची किंमत 50 हजारापासून दीड दोन लाखांपर्यंत आहे. पहाटे त्यांना चारा देणे, गोठा वेळच्या वेळी साफ करणे. दिवसभर घास गवत, शाळूदेणे, रात्री 8-9 वाजता त्याला चंदी देणे, चंदी म्हणजे मिक्स असते. गव्हाचे, सोयाबीनचें, उडदाचे भूस एकत्र करून त्याला मीठ लावून द्यावे लागते.

शर्यतीचे बैल असतील तर त्यांना मळलेली कणिक द्यावी लागते. महिन्यातूनएकदा त्यांना धुऊन काढणे असे बरेच काम करावे लागते. पावसाळयाच्या काळात कोरडा चारा देण्यासाठी शाळू वाळवून ठेवावी लागते. असा एका बैलजोडीच्या दिवसाचा साधारणतः खर्च 300-350 च्या आसपास आणि ते बैल शर्यतीचे असतील तर त्याच्या दुप्पट खर्च येतो. ज्यांना हा खर्च परवडतोते बैलजोडी पाळतात. नाही ते पाळत नाहीत. बैलांचे काम करणारे सालदारही आता राहिलेले नाहीत.

रमेश बदामे, शेतकरी, वेळापूर (निफाड)

गोर्‍हे बाजारात नेऊन विकतात

शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. गावठी गायी कमी दूध देतात. त्यातुलनेत जर्सी गाई भरपूर प्रमाणात दूध देतात. गावठी गाय ज्या शेतकर्‍यांकडे असते त्यांना होणारा गोर्‍हा (विकत नसल्याने) पुढे बैल होत होता.

त्यामुळे प्रत्येक शेतकर्‍याकडे बैलजोडी हमखास असायचीच. मात्र, अलीकडच्या काळात दुग्धव्यवसाय वाढल्याने जर्सी गाईंचे प्रमाण वाढले आहे. जर्सी गाईंना होणारे गोर्‍हेगावठी बैलांसारखे शेतीकामात उपयुक्त ठरत नाहीत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी हे गोर्‍हे लवकरच बाजारात नेऊन विकतात. त्यामुळेही बैलांचे प्रमाण ग्रामीण भागात कमी झालेले आहे.

योगेश आव्हाड, दुग्ध व्यावसायिक

पशुवैद्यकीय विभागाकडून देण्यात येणार्‍या सेवा

आजारी जनावरांवर औषधोपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन सेवा, खच्चीकरण, शस्त्रक्रिया करणे, गर्भतपासणी करणे, वंध्यत्व निवारण साठी उपचार, शवविच्छेदन करणे तसेच पशुपालकांना शास्त्रीय पद्धतीने पशुपालन करण्यासाठी चारा नियोजन व पशुव्यवसायाचे चांगले व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन केले जाते.

बैलांना 8-10 प्रकारचे आजार होतात!

19 व्या पशुगणनेनुसार नाशिक जिल्ह्यात साधारणतः देशी बैलांची संख्या 4 लाख 25 हजार 504 तर संकरितआणि इतर 4 लाख 70 हजार 026 आहे. बैलांना सामान्यतः 8-10 प्रकारचे आजार होतात. व्हायरल, खांदेदुखी, गोचीड ताप असे काही आजार 3-4 दिवसांच्या उपचारांनी बरे होतात. फर्‍या, घटसर्प अशा काही साथीचे लसीकरण केले जाते. बैलांना देखील शिंगाचा, डोळ्याचा कॅन्सर होतो. अशा काही आजारांचे उपचार मात्र दीर्घकाळ करावे लागतात.

डॉ, सचिन वेंदे, डॉ. संदीप पवार, पशुधन विकास अधिकारी, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या