नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिंहस्थाच्या (Simhastha) कामांचा प्राधान्यक्रम वेळेनुसार ठरवत व कामांचे विभागनिहाय वर्गीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी सिंहस्थ नियोजन बैठकीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मागील मंगळवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिलेल्या सुचनांनुसार कामे वेळेत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सुचनाही दिल्या.
यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार, नाशिक प्रांत अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सिंहस्थाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. मात्र, प्रत्येक कामासाठी कमी अधिक कालावधी लागणार असल्याने वेळेनुसार कामांची पूर्तता करण्यांच्या दृष्टीने कामांचा प्राधान्यक्रम ठरवा व विभागनिहाय कामांचे वर्गीकरण तात्काळ करुन कामाला सुरूवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कुंभमेळ्यानिमित्त (Kumbh Mela) होणारी कामे पर्यावरणपूरक, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावीत. पायाभूत सोयीसुविधा निर्मितीवर भर द्यावा. प्रत्येक विभागाने कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे अन्य निधीच्या स्त्रोतातून करता येतील का? याचीही पडताळणी करावी.कुंभमेळ्यानिमित्त शहरात येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ विकसित करण्याच्या कामास गती द्यावी. त्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाकडून (Central Government) सिंहस्थासाठी मिळणारा निधी हा टप्प्याटप्प्याने मिळण्याची शक्यता आहे. तसेच, राज्य शासन व महानगरपालिका यांच्या निधीतून देखील सिंहस्थाची कामे होणार आहेत. रस्ते, सीसीटीव्ही बसवणे, एसटीपीपी यासारख्या कामांना अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंहस्थापर्यंत ही कामे पूर्ण व्हावीत यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसत आहेत.
मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीसाठी वेळेची मागणी
सिंहस्थाचा मुख्य सचिवांसमोर मांडण्यात आलेला आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शिखर समितीत मांडला जाईल व त्यानंतर तो आराखडा केंद्र सरकार पुढे मांडण्यात येईल. त्यानंतर केंद्राचा निधी प्राप्त होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सिंहस्थासंदर्भातील बैठक व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळ मागण्यात आली आहे.