मालेगाव | प्रतिनिधी
मालेगावमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. आज आलेल्या ८४ अहवालांमध्ये ७३ अहवाल निगेटिव्ह आले तर ११ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामुळे मालेगावातील बाधित रुग्णांची संख्या १८३ वर पोहोचली आहे.
यात आतापर्यंत सात रुग्ण करोनामुक्त झाली आहेत तर शहरात आतापर्यंत १२ करोनाची लागण झालेल्या रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. आजच्या आकडेवारीअंती नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या २०५ वर पोहोचली आहे.
मालेगाव वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यांत ११ रुग्ण बाधित आहेत तर नाशिक शहरात ११ रुग्ण बाधित असून यामध्ये तिघांनी करोनावर मात केली असून त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे.
आठ पोलिसांना करोनाची लागण
मालेगावात आज ११ रुग्ण वाढले आहेत. यामध्ये ८ पोलीस कर्मचारयांचा समावेश आहे. यात शहरातील आयशा नगर पोलीस ठाणे, कॅम्प पोलीस, नियंत्रण कक्ष, दरेगाव पोलीस चौकी, निहालनगर पोलीस चौकी येथील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर एका जालना जिल्ह्यातील राज्य राखीव दलाच्या जवानालादेखील करोनाची लागण झाली आहे.
आज सकाळी ३६ अहवाल बाधित आढळून आल्यानंतर सायंकाळी पुन्हा १२ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे मालेगाव शहरात आज दिवसभरात ४८ अहवाल बाधित आढळून आले आहेत. यामध्ये चार रुग्णांची दुसरी चाचणी बाधित सिद्ध झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
काल अचानक ४४ अहवाल बाधित आढळून आल्यानंतर मालेगावमध्ये रुग्णसंख्या १७२ पार झाली होती. तर जिल्ह्यातील आकडा यामुळे १९३ ला पोहोचला होता. आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी मालेगावबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी योग्य ती मदत मालेगावला दिल्याचे आश्वासन दिले.
मालेगाव हॉटस्पॉट बनले असून मुंबई पुण्यानंतर राज्यात मालेगावची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.
नाशिक जिल्ह्यातील स्थिती
नाशिक मनपा
११ रुग्ण बाधित
दोघे बरे झाले
नाशिक ग्रामीण
११ रुग्ण बाधित
दोघे बरे झाले
मालेगाव मनपा
१८२ बाधित रुग्ण
०७ बरे झाले
१२ दगावले
नाशिक जिल्ह्यातील एकूण बाधित २०४