Friday, May 3, 2024
Homeनाशिकआपत्कालीन स्थितीसाठी धर्मादाय संस्थांच्या इमारतींची चाचपणी

आपत्कालीन स्थितीसाठी धर्मादाय संस्थांच्या इमारतींची चाचपणी

नाशिक – करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी शहरातील धर्मादाय संस्थांच्या इमारतींमधील बेड्सची चाचपणी सुरू केली आहे. याअंतर्गत नामको हॉस्पिटलमधील सेवा सदनाला भेट देऊन येथील निवासासह अन्य सुविधांची गुरुवारी संयुक्त पथकाने पाहणी केली.

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किरण सोनकांबळे, पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपमुख्य वैद्यकीय अधिकारी अजिता साळुंके आणि व उपमहाव्यवस्थापक किसन कानडे यांनी शहरातील जैन ओसवाल बोर्डिंग, नामको हॉस्पिटल, चोपडा एम्पायर, आदिवासी विभागाची होस्टेल्स, धर्मशाळा अशा विविध ठिकाणांना भेटी देत तेथील सुविधांची माहिती घेतली.

- Advertisement -

नामको हॉस्पिटलमधील सेवा सदनामधील निवास व्यवस्थेचीही या पथकाने पाहणी केली. विलगीकरणाच्या दृष्टीने निर्जंतुकीकरणाच्या सूचनाही दिल्या. याच भेटीदरम्यान, हॉस्पिटलमधील सॅनिटायजेशन व सुविधांची माहिती घेतली. नामको चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी शशिकांत पारख व विश्वस्त यांच्यासह हॉस्पिटचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यंत्रणेच्या मदतीसाठी या मान्यवरांचा पुढाकार

नामको बँकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, नामको चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी शशिकांत पारख, जैन ओसवाल बोर्डिंगचे अध्यक्ष हरिष लोढा, चोपडा एम्पायरचे संचालक सुनील चोपडा, विलासभाई शहा, शरद शहा, भारतीय जैन संघटनेचे नंदू साखला, गजपंथ देवस्थानच्या सुवर्णा काले, जितो संस्थेचे शांतीलाल बाफणा, सतीश हिरण, प्लॅटिनम ग्रुपचे यश टाटिया, सम्यक सुराणा, जैन सोशल ग्रुपचे प्रवीण संचेती, अर्पण रक्तपेढीचे नंदकुमार तातेड, अतुल जैन, तसेच पंकज पाटणी अशा जैन समाजातील विविध मान्यवरांनी यंत्रणेच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, जैन समाजातील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून महापालिका आयुक्तांची भेट घेऊन क्वारंटाइनसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली होती.

सेवा सदनातील खोल्यांची उपलब्धता

अवघा देश करोनामुळे संकटात सापडला असल्याने, सामाजिक बांधिलकी म्हणून आता प्रत्येक घटकाला आपापल्या परीने पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. त्यादृष्टीने आम्ही गरज भासल्यास हॉस्पिटलच्या सेवा सदनातील खोल्या विलगीकरणासाठी उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच, गरजवंतांना भोजनाची पाकिटे पुरवण्यादृष्टीनेही समाजाच्या स्तरावर विचार सुरू आहे.

– शशिकांत पारख, सेक्रेटरी, नामको ट्रस्ट

अन्य संस्थांनीही पुढाकार घ्यावा

करोनासारख्या संकटाप्रसंगी जैन समाजाने घेतलेला पुढाकार हा खरोखरच अन्य घटकांसाठीदेखील प्रेरणादायी आहे. समाजातील संस्था व व्यक्तींकडे अशा सुविधा उपलब्ध असतील, त्यांनीही पुढाकार घ्यावा.

– प्रकाश थविल, सीईओ, नाशिक स्मार्ट सिटी

- Advertisment -

ताज्या बातम्या