मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
मुंबईतील (Mumbai) गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिक जवळच्या इगतपुरी (Igatpuri) येथे भव्य चित्रनगरी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या बैठकीत नाशिक चित्रनगरीसाठी सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन हस्तांतरित करून देण्याचे निर्देश देण्यात आले. चित्रनगरीसाठी आर्थिक सुसाध्यता अहवाल आणि विश्लेषण करण्यासाठी केपीएमजी या तज्ज्ञ सल्लागार कंपनीची नेमणूक करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
नाशिक विभाग विकास कार्यक्रम २००९ अंतर्गत नाशिक येथे चित्रपटसृष्टी निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. नियोजन विभागाने सन २००९ ते २०१२ या कालावधीसाठी नाशिक चित्रपटसृष्टीसाठी १० कोटी रुपये इतका नियतव्यय मंजूर केला होता. या प्रकल्पासाठी मौजे मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथे प्रत्यक्ष पाहणी करून सर्व्हे क्रमांक ४५९ येथील ५४.५८ हेक्टर मधील ४७ हेक्टर ३९.आर ही शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यासाठी जमीन जिल्हाधिकारी नाशिक यांनी महसूल विभागाला प्रस्ताव पाठवला आहे.
या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत इगतपुरी चित्रनगरीबाबत (Film City) निर्णय घेण्यात आला. चित्रनगरीसाठी प्रस्तावित असलेला इगतपुरीचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुंदर आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे इगतपुरीपासून मुंबईचे अंतर सुद्धा कमी झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही लवकरच एक भव्य चित्रपटनगरी साकारणार असल्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर सांगितले.
नाशिक (Nashik) चित्रनगरीचा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि सुसाध्य आहे किंवा कसे याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे काम दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळामार्फत मिटकॉन या संस्थेला देण्यात आले होते. मिटकॉन या संस्थेने व्यवहार्यता अहवाल तयार करून तो महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाला सादर केला आहे.महामंडळाने या अहवालाचे विश्लेषण आणि तपासणी करून तो राज्य सरकारला सादर केल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
तर नाशिक येथे चित्रनगरी व्हावी असा आमच्या विभागाचा मानस आहे. या चित्रनगरीसाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक करण्याचे निर्देश देखील देण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी बैठकीत सांगितले. इगतपुरीला चित्रनगरी सोबतच अम्युझमेंट पार्क करण्यात यावा, असा प्रस्ताव विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बैठकीत मांडला.
दरम्यान, या बैठकीला वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नाशिक समिती प्रमुख शाम लोंढे, दिग्दर्शक राजू फिरके, लाईन प्रोड्युसर अमित कुलकर्णी, कलादिग्दर्शक प्रसाद राहणे, चित्रपट निर्माता अंबादास खैरे आदी उपस्थित होते.




