Saturday, May 9, 2026
Homeनाशिकशक्तीचा जागर आणि कलेचा अविष्कार; 'देशदूत कर्मयोगिनी' पुरस्कार सोहळा पडला उत्साहात पार

शक्तीचा जागर आणि कलेचा अविष्कार; ‘देशदूत कर्मयोगिनी’ पुरस्कार सोहळा पडला उत्साहात पार

नृत्याविष्काराने लावले 'चार चांद'; प्रेक्षक झाले बेभान

नाशिक | Nashik

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ‘दैनिक देशदूत’ (Daily Deshdoot) आयोजित व सोनी पैठणी, टकले ज्वेलर्स व इंडियन ऑइल प्रायोजित ‘देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार २०२६’ सोहळा नाशिकमध्ये अत्यंत दिमाखात आणि उत्साहात बहारदार वातावरणात पार पडला. नाशिक-पुणे रोडवरील नंदिनी पुलाजवळील नासिक्लब येथे सायंकाळी रंगलेल्या या सोहळ्याला चित्रपट व कलाविश्वातील नामांकित सेलिब्रिटींच्या उपस्थितीन कार्यक्रम अधिकच तारांकित आणि संस्मरणीय ठरला.

- Advertisement -

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर, अश्विनी कासार, रूचिता जाधव, माधुरी पवार, अदिती सारंगधर, सोनाली पाटील, आरती सोळंकी तसेच गायिका मुग्धा कऱ्हाडे आदींसह नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, मविप्र सरचिटणीस अ‍ॅड नितीन ठाकरे, देशदूत मीडिया ग्रुपचे अध्यक्ष विक्रम सारडा, सौ.सुनीता सारडा, नासिक्लबच्या संचालिका विनिता सारडा, ओजश्री सारडा, संपादक शैलेंद्र तनपुरे, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, प्रायोजक सोनी पैठणीचे संचालक संंजय सोनी, जीवनगौरव पुरस्कार्थी विद्याताई फडके, यंग रायझिंग अवॉर्ड प्राप्त ईशा चंदे आदी उपस्थित होते.

या सोहळ्यात शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, उद्योग आणि कृषी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या २७ महिलांचा सन्मान करण्यात आला. घरकुल परिवाराच्या अध्यक्षा विद्याताई फडके यांना जीवनगौरव पुरस्काराने (Awards) आणि दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या संचालिका ईशा चंदे यांना यंग रायझिंग अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. याशिवाय महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह २४ कर्तृत्ववान महिलांना ‘देशदूत कर्मयोगिनी विशेष पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा उत्सव ठरला.सामाजिक बांधिलकी जपत प्रेरणादायी व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची ‘देशदूत’ समूहाची परंपरा या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली. ‘देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार २०२६’ सोहळा हा महिलांच्या (Women) कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि यशाचा प्रेरणादायी उत्सव ठरला. अभिनेत्री व निवेदिका दीप्ती भागवत यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अत्यंत प्रभावी व आकर्षक पद्धतीने केले.

यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, देशदूतने स्थापनेपासूनच सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील मूल्यांचा जप करत समाजमन घडविण्याचे कार्य सातत्याने केले आहे. ‘कर्मयोगिनी पुरस्कार’ हा केवळ सन्मान नसून तो समाजासाठी काम करणार्‍या महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेणारा आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा उपक्रम आहे. या पुरस्कारामुळे आमच्या कार्याला नवी दिशा मिळाली असून अधिक जोमाने आणि व्यापक स्वरूपात काम करण्याची उर्जा मिळाली आहे. येत्या सिंहस्थ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासासाठी तसेच स्वच्छता, नियोजन आणि जनजागृतीच्या उपक्रमांमध्ये अधिक प्रभावी योगदान देण्याचे बळ या सन्मानातून मिळाले आहे. या पुरस्कारामुळे आमच्यावरची जबाबदारी अधिक वाढली असून ती समर्थपणे पार पाडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना ‘घरकुल’ संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई फडके यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, हा पुरस्कार केवळ माझ्या नावावर असला तरी तो प्रत्यक्षात घरकुल परिवारातील प्रत्येक सदस्याचा आहे. संस्थेच्या कार्यात ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले, निस्वार्थ भावनेने सेवा दिली आणि गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवला, त्या सर्वांच्या योगदानामुळेच हा सन्मान शक्य झाला आहे. देशदूतचे संस्थापक स्व. देवकीसन सारडा व कमलताई सारडा यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ आम्हाला नेहमीच लाभले. त्यांनी केवळ शब्दांनी नव्हे, तर कृतीतून सामाजिक बांधिलकी जपली. प्रत्येक सण-उत्सवाच्या वेळी आमच्या संस्थेला मदतीचा हात देत त्यांनी आमच्यात नवे बळ निर्माण केले. त्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. हा प्रेरणादायी वारसा आता विक्रम सारडा व सुनीता सारडा पुढे नेत असून, त्यातून समाजकार्याची परंपरा अधिक भक्कम होत आहे. आमच्यासारख्या सेवाभावी संस्थेला जीवनगौरव पुरस्कार देऊन देशदूतने सामाजिक बांधिलकीची जपणूक केली आहे, असे त्यांनी नमूद केले. शेवटी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रेरणादायी ओळी सादर करत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

‘यंग रायझिंग अवॉर्ड’ प्राप्त ईशा चांदे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. माझ्यासाठी काम हीच खरी जीवनधारा असून समाजासाठी काहीतरी सकारात्मक आणि परिणामकारक करण्याची माझी सातत्याने धडपड असते. नाशिकला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचे आमचे ध्येय असून, त्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. समाजाला चांगले, दर्जेदार आणि उपयुक्त देण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, याची जाणीव या पुरस्कारामुळे अधिक ठळक झाली आहे. नव्या भारताच्या उभारणीत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. मला माझ्या आई-वडिलांचे प्रेम, मार्गदर्शन आणि पाठबळ सतत मिळाले, त्याच बळावर ही यशाची झेप घेणे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले. भविष्यातही अधिक मेहनत, निष्ठा आणि प्रामाणिकपणाने काम करत समाजासाठी योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

अभिनेत्री माधुरी पवार, रूचिता जाधव यांच्या बहारदार नृत्याविष्काराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सांस्कृतिक रसिकांसाठी अविस्मरणीय ठरलेला अभिनेत्री माधुरी पवार आणि रूचिता जाधव यांचा बहारदार नृत्याच्या कार्यक्रमाला नाशिककरांनी प्रचंड प्रतिसाद देत सोहळ्याची रंगत वाढवली. कार्यक्रमात अभिनेत्रींच्या दमदार नृत्याविष्काराने पुरस्कार वितरण सोहळा बहारदार झाला. पारंपरिक व आधुनिक अशा विविध गाण्यांवर सादर केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. माधुरी पवार यांच्या लावणी सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली, तर रुचिता जाधव यांच्या जोशपूर्ण नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. शिट्टी वाजली, गाडी सुटली… सुंदरी सुंदरी तुुझ नाव काय हाय गं?, .मराठ मोळा… थोडासा गं भोळा, आली ठुमकत अशा सदाबहार विविध गाण्यांनी रसीकांना ठेका धऱयाला लावला, टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांच्या गजरात , वन्स मोर म्हणत कलाकारांना भरभरून प्रतिसाद दिला. नाशिककरांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटत कलाकारांचे कौतुक केले. सांस्कृतिक उपक्रमांना मिळणारा असा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिकच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची साक्ष देणारा ठरला. कार्यक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात अशाच दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्याची मनीषा व्यक्त झाली.

बालकांपासून ते वृद्धांपर्यंत उपस्थिती

खास महिलांसाठी आयोजित या रंगारंग कार्यक्रमामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभली, ती खरोखरच दाद देण्यासारखीच होती. कर्मयोगिनी पुरस्कारासाठी राजकीय, सामाजिक, शेती, शैक्षणिक, उद्योजक,विधी क्षेत्र अशा विविध गटातील महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. अशा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास बालकांपासून वृद्धांपर्यंत महिलांनी लावलेले हजेरी या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य ठरले.

’तारांकित’ सादरीकरण

विविध क्षेत्रांत ठसा उमटवणार्‍या शहर व जिल्ह्यातील महिलांचा या सोहळ्यात मोठ्या दिमाखात गौरव करण्यात आला. हा सोहळा केवळ मनोरंजनाचा नव्हता, तर महिलांच्या जिद्दीला आणि कष्टाला सलाम करणारा एक ’भव्य-दिव्य’ उत्सव ठरला, तो सर्वांच्याच मनात निश्चितपणे कोरला गेला.

यांचा झाला गौरव

राजकीय : महापौर हिमगौरी आहेर आडके, मंदाकिनी बनकर, विद्याताई बलकवडे, सविता गायकर, उषा बेंडकोळी, जयश्री गायकवाड, प्रियांका दोंदे, मयुरी पवार, संध्या कुलकर्णी, अदिती पांडे, रेखा सकाळे
कृषी : संगीता बोरसे
विधीक्षेत्र : अ‍ॅड. जया शर्मा
सामाजिक : शीतल सोनवणे-उगले, सायली पालखेडकर, स्मिता पाटोदकर
उद्योग : ईशा चंदे, स्वाती अष्टेकर, ऐश्वर्या वाघ, डॉ. वृषाली जोशी
योग : वंदना रकीबे
शैक्षणिक : डॉ. लतिका गायकवाड, डॉ. स्मिता चौधरी, सुहासिनी घोडके
मॉडेलिंग/समाजसेवा : डॉ. तरन्नुम शेख
वैद्यकीय : डॉ.सुप्रीया मांगुळकर

ताज्या बातम्या

निदा

Asaduddin Owaisi: सुक्षिशित मुस्लीम मुलामुलींना…;निदा खान प्रकरणावर असदुद्दीन ओवैसींचं भाष्य, म्हणाले,...

0
छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarनाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य महिला आरोपी असलेली निदा खान २७ दिवस फरार होती. अखेर तिला छत्रपती...