Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : 'सिव्हिल'वर मनपाचा रुग्णभार नकोच; जिल्हा शल्यचिकित्सकांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र

Nashik News : ‘सिव्हिल’वर मनपाचा रुग्णभार नकोच; जिल्हा शल्यचिकित्सकांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र

औषधपुरवठा कमी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका हद्दीतील (NMC Area) नागरिकांसाठी मनपा रुग्णालये आहेत. जिल्ह्यासह ग्रामीण भागातील (Rural Area) नागरिकांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल) आहे. त्यातूनच औषधे व इतर सामुग्री डीपीडीसीतून मिळते. त्यामुळे शहर कार्यक्षेत्रातील रुग्णांचा (Patients) अतिरिक्त भार थेट जिल्हा रुग्णालयावर येत असल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी उपलब्ध औषधसाठा अपुरा पडतो. त्यामुळे मनपा हद्दीतील सर्वच प्रकारच्या रुग्णांवर मनपा रुग्णालयांतच उपचार करावेत, जिल्हा रुग्णालयात धाडू नये, अशा आशयाचे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवले आहे. त्यामुळे आता महापालिका व जिल्हा रुग्णालयात जुंपण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नाशिक शहर आणि महापालिका कार्यक्षेत्रातून (Municipal Jurisdiction) बरेचसे रुग्ण प्राथमिक उपचार न करता पुढील उपचारांसाठी मनपा रुग्णालय टाळून थेट जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्याचे प्रमाण वाढले आहे. वास्तविक जिल्हा रुग्णालय हे ग्रामीण भागातून रेफर होणाऱ्या रुग्णांसाठी आरोग्यसेवा मिळण्याचे एकमेव केंद्र आहे. राज्यस्तरावरून व जिल्हा नियोजन निधीतून (डीपीडीसी) जिल्हा रुग्णालयासाठी मिळणारे अनुदान फक्त ग्रामीण भागातील लोकसंख्येवर आधारित असते. महापालिका क्षेत्रातील रुग्णांना आवश्यक असणारी औषधे व साहित्य सामुग्रीचे अनुदान नाशिक महापालिकेस स्वतंत्ररीत्या प्राप्त होते.

YouTube video player

परंतु शहर कार्यक्षेत्रातील रुग्णांचा अतिरिक्त भार जिल्हा रुग्णालयावर (Civil Hospital) पडत असल्याने रुग्णालयातील रुग्णांना उपलब्ध औषधसाठा अपुरा पडत आहे. ही बाब विचारात घेऊन महापालिका कार्याक्षेत्रातील भिक्षेकरी, निराधार, अनोळखी, बेघर रुग्णांना यापुढे जिल्हा रुग्णालयात न पाठवता मनपा रुग्णालयात त्यांची व्यवस्था व उपचार करावे तसेच शहरी आरोग्य केंद्रातून रुग्ण संदर्भित करताना प्रथम मनपा रुग्णालयांना प्राधान्याने संदर्भसेवा द्यावी, असे खरमरीत पत्र शिंदे यांनी पाठवले आहे. त्यामुळे प्रकरण चिघळण्यास सुरुवात झाली आहे. मनपा व जिल्हा रुग्णालयात याबाबत चर्चा झडू लागली आहे.

कलगीतुरा वाढणार

मनपा स्तरावर रुग्णोपचार शक्य नसल्यास मनपाअंतर्गत येणाऱ्या मोठ्या रुग्णालयातून येणाऱ्या रुग्णांनाच जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाईल. तसेच संदर्भसेवा देतानादेखील महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयांचा प्राधान्याने विचार व्हावा, असे पत्रात नमूद आहे. त्यामुळे दोन्ही आरोग्य यंत्रणांतील कलगीतुरा वाढणार आहे. महापालिका या पत्रास काय उत्तर देते, याकडेच रुग्णांसह आस्थापनांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात आता जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व आरोग्य उपसंचालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पत्राची प्रत मनपा आयुक्त, १०८ रुग्णवाहिकेचे व्यवस्थापक व आरोग्य उपसंचालकांना पाठवली आहे.

ताज्या बातम्या

MLA Manikrao Kokate : आमदार माणिकराव कोकाटे यांना पितृशोक

0
सिन्नर | प्रतिनिधी सिन्नर तालुक्याचे आमदार, माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे वडील, कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव मुरलीधर कोकाटे(९३) यांचे आज...