नाशिक | प्रतिनिधी | Nashik
निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) एका आशा वर्करवर (ASHA Worker) १०२ ॲम्बुलन्स चालकाकडून झालेल्या लैंगिक छळप्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेविरोधात महाराष्ट्र राज्य आशा–गट प्रवर्तक कर्मचारी कृती समिती आणि आयटक यांच्यावतीने निफाड पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले. दरम्यान, संशयित भाऊसाहेब गुढगे हा राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी वाहनचालक पदावर रोजंदारीने काम करत असल्याने त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव (वाकडा) चे वैद्यकीय अधिकारी यांनी गैरवर्तणूक प्रकरणामुळे तात्काळ कार्यमुक्त केले आहे.
याबाबतचा अहवाल त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांना पाठविला आहे. घडलेल्या घटनेनुसार पीडित आशा वर्करने गर्भवती महिलेस प्रसूतीसाठी देवगाव व नंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) नेल्यानंतर परतीच्या प्रवासात संशयित चालक भाऊसाहेब गुढघे (रा. निमगाव वाकडा) याने शिवरे फाट्याजवळ ॲम्बुलन्स थांबवून पीडित आशा वर्करशी अश्लील वर्तन करत अश्लील प्रस्ताव मांडला.
यावेळी त्यांनी तत्काळ विरोध करत ॲम्बुलन्समधून उतरून नातेवाइकांना संपर्क साधला. सध्या त्या उपचार घेत आहेत. तर या घटनेचा निषेध करत राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी ही केवळ एका महिलेवरील (Women) नाही तर संपूर्ण आशा वर्गाच्या सन्मानावर झालेली लज्जास्पद घटना असल्याचे म्हटले आहे.
संघटनेच्या मागण्या
संशयित आरोपीवर कलम ३५४, ५०९ आणि पॉश कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा. पीडितेला शासनाकडून संरक्षण, वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि आर्थिक भरपाई द्यावी.महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, जीपीएस व्यवस्था आणि महिला साथीदारासह प्रवासाची अनिवार्यता लागू करावी. निवेदन देताना जिल्हा अध्यक्षा सुरेखा खैरनार , प्राजक्ता कापडणे, तल्हा शेख, मनिषा खैरनार, रोहिणी मुदगल, रुपाली सानप, वैशाली कवडे, छाया जगताप, माधुरी बर्वे, वर्षा गांगुर्डे, प्रीती भाबड, सविता पवार, सोनाली उफाडे, कावेरी कदम आदींसह तालुक्यातील सर्व आशा–गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर वाहनचालक गुढघेला कामावरून कमी करावे,अशी मागणी आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटनेने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन त्यास तात्काळ कमी करण्यात आले आहे. यासंदर्भात निफाड पंचायत समिती कार्यालयात झालेल्या सभेत आशा कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा प्रश्न आता जनआंदोलनाचा विषय होईल, असा निर्धार व्यक्त केला.




