नाशिक | Nashik
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील (Nashik City) तपोवन (Tapovan) येथील तब्बल १८०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. मात्र, या कत्तलीला पर्यावरणप्रेमींसह राजकीय पक्षांनी (Political Party) विरोध दर्शविला आहे. तर महापालिकेकडून ही १८०० झाडे तोडण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रश्न निकाली निघालेला नसतानाच आता नवीन एसटीपी प्लांटसाठी ३०० झाडे तोडण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी ४४७ झाडे तोडण्याची अधिकृत नोटीस देण्यात आली होती. त्यातील ३०० झाडे (Trees) तोडण्यात आली असून, उर्वरित झाडे वाचवण्यात आली असल्याचा दावा करण्यात येत आहे. आगामी सिंहस्थ लक्षात घेऊन शहरातील विकासकामांना वेग आला असला तरी, त्याचा परिणाम पर्यावरणावर (Environment) होऊ नये, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पर्यावरणप्रेमींनी केलेल्या या आरोपानंतर तपोवन परिसरात उभारले जाणारे नवीन एसटीपी प्लांट (STP Plant) देखील वादात सापडले आहे. तर पर्यावरणप्रेमींनी तीनशे पेक्षा अधिक झाडांची कत्तल करण्यात आल्यामुळे परिसरातील जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली आहे.
एसटीपी प्लांटसाठी झाडे तोडण्याची कारवाई मागेच झालेली असून, नवीन नाही. याबाबत वर्तमानपत्रात देखील हरकती मागवण्यात आल्या होत्या.
विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, नाशिक मनपा
अण्णा हजारेंनीही तपोवनातील वृक्षतोडीवरही स्पष्ट केली भूमिका
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तपोवनात तोडल्या जाणाऱ्या वृक्षतोडीबाबत बोलतांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्यप्राण्यांना देखील जीवदान मिळते. सिंहस्थ हा जरी समाजहिताचा आणि राष्ट्र हिताचा असला तरी त्यासाठी झाड तोडू नयेत. फारच आवश्यक असेल तर छोटी झाड तोडावेत. मात्र, मोठ्या झाडांना तोडू नये, अशी माझी विनंती असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.




