नाशिक | प्रतिनिधी | Nashik
त्र्यंबक रोडवरील (Trimbakeshwar Road) रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) कडून सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला ग्रामस्थ आणि शेतकरीवर्गाकडून (Farmer) तीव्र विरोध होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरांवर आणि शेतीलगतच्या बांधकामांवर जेसीबी फिरविण्याची तयारी दिसताच परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थ आज (बुधवारी)रस्त्यावर उतरले. महिलांसह वृद्ध नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. आज सकाळीच महापालिका हद्दीलगतच्या पिंपळगाव बहूला येथून त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी फाट्यापर्यंत ही मोहीम सुरू करण्यात आली. ४० ते ५० वर्षांपासून येथे घरे, दुकाने, जनावरांचे गोठे आदी बांधकामे आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील या घरांना परवानगी असून त्यातील काही घरे चाळीस ते ५० वर्षे जुनी आहेत. मात्र आता ती रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरली आहेत. त्यामुळे एनएमआरडीएकडून ती हटविली जात आहेत.
यावेळी शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, “आम्हाला विकासकामांना विरोध नाही, परंतु आमच्या घरांवर आणि उपजीविकेच्या साधनांवर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करणे अमान्य आहे.शेतकऱ्यांचा आरोप आहे की, त्यांच्या नावावर सातबारा उतारा आणि सर्व मालकी कागदपत्रे असताना शासन त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि रोष वाढला आहे.शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून माकपचे नेते, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, आमदार सरोज अहिरे, तेजस भावले, विठोबा कापसे, कैलास खांडबहाले, समाधान गुंबाडे दत्तू ढगे, सीमा घुगे, कावेरी घुगे यांच्यासह परिसरातील सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर ठाण मांडले होते. तर अनेकांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, आंदोलनामुळे (Agitation) काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी (Police) हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रशासनाने विकासकामे नियमानुसार सुरू असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या अडचणींवर योग्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले आहे.





